आरोपी कडुन १५० हुन अधिक बॅंक खात्याचा वापर, तर पिंपरी चिंचवड सह फसवणूक झालेल्या लोकांना दिलासा.
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरी :- दुबईत बसून ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक लोकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने अटक करून सायबर टोळीचा पर्दाफाश केली आहे. सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे (वय वर्ष २६ रा. निगडी प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश पिंपरी चिंचवड पोलीसांना मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी तुषार अमराराम चौधरी आणि आदर्श संतोष वाघमारे या दोघांना अटक केली होती. हे दोघे विविध बँकांमध्ये खाती उघडून घेत असत. सायबर गुन्ह्यांमधून फसवणूक करून मिळालेली रक्कम रोख स्वरूपात तसेच चेकद्वारे काढून घेऊन त्यातील उर्वरित रक्कम दुबईत असलेल्या मुख्य आरोपी सुमंत दसरे याच्याकडे पाठवत असल्याचे तपासात समोर आले.
मुख्य आरोपी परदेशात असल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केले होते. त्यानंतर इंटरपोलच्या मदतीने दुबईतून त्याला डिपोर्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावर दाखल होताच पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीनी हैदराबाद, तेलंगणा, पिंपरी चिंचवड काळेवाडी येथे ही गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आरोपीला ४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे
या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच फसवणुकीची रक्कम कुठे वळविण्यात आली, याचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावारकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.






























