पिंपरीत खळबळ! सणासुदीच्या तोंडावर ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला लुटले; ४ लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास


पिंपरीत खळबळ! सणासुदीच्या तोंडावर ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला लुटले; ४ लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास

**पिंपरी (  चंद्रशेखर पात्रे):**

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने व्यावसायिक आपले साहित्य विक्रीसाठी जीवाचे रान करत असतानाच, पिंपरीतील सुप्रसिद्ध शगुन चौक परिसरात एका व्यापाऱ्याला लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दुकान बंद करून घरी जाणाऱ्या ४५ वर्षीय ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून पाच अज्ञात तरुणांनी तब्बल चार लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली आहे. गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) रात्री घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

किशन धामेजा असे लुटीला बळी पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किशन धामेजा आपले दुकान बंद करून रात्रीच्या वेळी घरी जात होते. दरम्यान, शगुन चौक परिसरात दुचाकीवरून आलेल्या पाच अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. त्यानंतर कोणतीही संधी न देता धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील चार लाख रुपयांची रोख रक्कम आणि त्यांची दुचाकी बळकावली आणि आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

**सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद**

दिवसाढवळ्या किंवा रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या धाकाची भीती उरलेली नाही हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते. लुटीची ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस त्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

**व्यापारी वर्गाकडून सुरक्षेची मागणी**

सणासुदीच्या काळात रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवावी लागत असल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असल्याने व्यावसायिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे आणि रात्रीच्या वेळी शहरात पोलीस गस्त वाढवावी, अशी आक्रमक मागणी पिंपरीतील त्रस्त व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

 

 

 


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!