पाताळगंगेत प्रशासकीय ‘सर्कस’ आणि कचऱ्याचा ‘रास’!


ग्रामपंचायत अन् औद्योगिक विभागाचा ‘तू तू-मै मै’; जनतेचा मात्र कोंडला जातोय श्वास!

सुनील पाटील ;

पाताळगंगा: एकेकाळी औद्योगिक क्रांतीची ‘गंगा’ म्हणून मिरवणाऱ्या पाताळगंगेत आज चक्क कचऱ्याचा ‘होम’ पेटला आहे! एम.आय.डी.सी. क्षेत्रातल्या रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे जे डोंगर उभे राहिले आहेत, ते पाहून कुणालाही वाटावे की हे औद्योगिक क्षेत्र आहे की एखाद्या महापालिकेचा अधिकृत उकिरडा? पण खरा गंमतशीर प्रकार तर या कचऱ्याच्या विल्हेवाटीवरून सुरू असलेल्या ‘बोट दाखवा-दाखवी’च्या खेळात लपला आहे!

घाणीचा खेळ! जनता बेहाल, प्रशासन मालामाल!

येथील कारभार म्हणजे जणू काही ‘सर्कस’ सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली की, ते थाटात बोट दाखवतात औद्योगिक विभागाकडे! आणि औद्योगिक विभागाला जाब विचारला की, ते तितक्याच तत्परतेने बोट मोडतात ग्रामपंचायतीकडे! एकमेकांकडे बोटं दाखवण्याच्या या नादात, या दोन्ही प्रशासनांचे हात मात्र स्वच्छतेपासून मैलोन्मैल लांब आहेत. अहो, एकमेकांकडे बोटं दाखवून तुमची शरीरयष्टी सुधारेल, पण या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे रस्त्यांची रुंदी मात्र नक्कीच रोडावली आहे!

रस्त्यावर अपघाताची ‘बिछात’!

रस्त्याच्या कडेला हा जो काही घाणीचा अभिषेक सुरू आहे, त्यामुळे रस्ते इतके अरुंद झाले आहेत की, वाहनचालकांना आता रस्ता शोधण्यासाठी ‘दुर्बीण’ घेऊन फिरावे लागते. उद्या एखादा भीषण अपघात झाला, की मग हे दोन्ही विभाग पुन्हा एकमेकांकडे बोटं दाखवत बसतील का? हा आमचा जळजळीत सवाल आहे. “वारंवार निदर्शनास आणून दिले” असा कागदी घोडा नाचवून एम.आय.डी.सी. हात झटकत आहे, तर “आम्ही काय करावे?” असा केविलवाणा चेहरा करून ग्रामपंचायती प्रशासन मिरवत आहेत.

प्रेस मीडिया लाईव्हचा चिमटा:

दोन्ही बाजूंच्या या ‘बोट दाखवा’ खेळाला आता जनतेनेच चाप लावण्याची वेळ आली आहे. अहो, तुमची ही बोटं एकमेकांकडे रोखण्यापेक्षा, ती जर कचरा उचलण्याच्या कामात वापरली असती, तर आज पाताळगंगेचा गळा असा आवळला गेला नसता! या पोरखेळात सामान्य माणसाचा श्वास कोंडतोय आणि उद्योगांची नाचक्की होतेय, याचे काही सोयरसुतक आहे की नाही?

लक्षात ठेवा, प्रशासकीय जबाबदारी झटकून तुम्ही कितीही बोटं दाखवलीत, तरी लोकांच्या मनात मात्र तुमच्या या ‘बेजबाबदार’ कारभाराबद्दल एकच ‘बोट’ उभे आहे… ते म्हणजे ‘धिक्काराचे’!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!