लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त; सांगवी पोलिसांच्या धडक कारवाईने नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले
पिंपरी (प्रतिनिधी : चंद्रशेखर पात्रे)
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव व सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सवर कडक बंदी घालण्यात आली होती. पोलिसांच्या स्पष्ट आदेशानंतर आणि वेळोवेळी घेतलेल्या बैठकांमधील लेखी सूचनांनंतरही सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीत नियमांचा फज्जा उडवणे सांगवीतील ९ गणेश मंडळांना चांगलेच भोवले आहे. सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत या नऊ सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह संबंधित डीजे मालक आणि चालकांवर थेट गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या दणक्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मंडळांचे आणि डीजे चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडून उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात होती. आदेशांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईचा बडगा उचलला. या धडक कारवाईत पोलिसांनी ५ डीजे सिस्टीम, ३ मिक्सर, डीजे कन्सोल, १ लाईट कंट्रोल मशीन, ३ लॅपटॉप, १ स्पीकर तसेच ट्रॅक्टर, ट्रॉली आणि साऊंड स्पीकरसह संपूर्ण १ डीजे सेट असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) संदीप आटोळे आणि सांगवी विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदेकर, पोलीस निरीक्षक माळेगावे, पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक बोराडे, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पाटील, जावळे, आकमवाड, बराते, कांबळे, परी. जाधव, पोलीस हवालदार साळुंखे (बॅज क्र. ८५४), महिला पोलीस हवालदार फाळके (बॅज क्र. १२०३), पोलीस शिपाई आहेर (बॅज क्र. २५4५) व सांगवी तपास पथकातील अंमलदारांनी केली आहे.
**पोलीस प्रशासनाचा कडक इशारा:**
गणेशोत्सव कालावधीत आणि आगामी विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणत्याही गणेश मंडळाने उच्च क्षमतेचे डीजे अथवा डॉल्बी साऊंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण करू नये. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संगणक, मिक्सर, कन्सोल आणि वाहनांसह डीजे साहित्य जप्त केले जाईल. अशा गैरप्रकारांना आणि कायदेशीर कारवाईस संबंधित मंडळांचे पदाधिकारी व आयोजक स्वतः जबाबदार राहतील, असा सज्जड इशारा पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.





























