अरे बापरे! ओव्हरलोड डंपरांच्या ओझ्याखाली दबतोय मुंबई-पुणे जुना महामार्ग; प्रशासनाला जाग कधी येणार?

सुनील शालिक पाटील
मुंबई-पुणे जुन्या महामार्गासह पेन, खालापूर, रसायनी आणि खारघर परिसरात खडी, क्रश सँड तसेच बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या ट्रक आणि डंपरमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असल्याचा मुद्दा सध्या नागरिकांमध्ये गंभीर चर्चेचा विषय ठरत आहे.
दिवस-रात्र हजारोंच्या संख्येने अवजड वाहने या मार्गावरून धावत असून, या ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था तर होतच आहे, शिवाय अपघातांचा भीषण धोकाही वाढला आहे. विशेषतः दुचाकी, तीनचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनचालकांना या अवजड वाहनांच्या गर्दीतून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे वाहनाचा वेग नियंत्रित करणे, ब्रेक लावणे तसेच अचानक वाहनावर नियंत्रण ठेवणे चालकांसाठी कठीण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पेन आरटीओ तसेच खारघर आणि लोणावळा आरटीओ कार्यक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी अशा वाहनांवर नियमित तपासणी व कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, काही वाहनांवरच कारवाई केली जाते आणि काही वाहनांना अभय मिळते, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही वाहनचालकांकडून किंवा वाहतूक व्यावसायिकांकडून कथित मासिक हप्त्यांच्या माध्यमातून कारवाई टाळली जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने खडी, क्रश सँड आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई झाल्यास वाहतूकदारांना आर्थिक फटका बसेल, म्हणून नियमांकडे दुर्लक्ष केले जाते का, असा सवालही उपस्थित होत आहे.
पेन, खारघर, लोणावळा आरटीओ तसेच वाहतूक पोलीस विभागाने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर विशेष तपासणी मोहीम राबवावी, वाहनांचे वजन काट्यावर तपासावे, क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि नियमभंग करणाऱ्यांना कोणतेही अभय देऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आज ओव्हरलोड वाहनांकडे दुर्लक्ष झाले, तर उद्या एखाद्या निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता संबंधित प्रशासनाने वेळीच जागे होणे गरजेचे आहे.
प्रश्न एकच — ओव्हरलोड वाहनांवर खरोखरच समान नियमाने कारवाई होणार की सामान्य नागरिकांनी जीव मुठीत धरूनच प्रवास करायचा?






























