साहेबांची पिस्तुलबाजी आणि ५० हजारांची वसुली , मद्यधुंद वनअधिकाऱ्यांचा रस्तालूट की सरकारी ड्युटी ? कॉ. सिडाम यांचा कडाडून हल्ला !


साहेबांची पिस्तुलबाजी आणि ५० हजारांची वसुली !

मद्यधुंद वनअधिकाऱ्यांचा रस्तालूट की सरकारी ड्युटी ? कॉ. सिडाम यांचा कडाडून हल्ला !

नांदेड | जैनोद्दीन पटेल :

जंगलातल्या वाघ-बिबट्यांपासून जनतेचे रक्षण करायचे सोडून, आजकाल वनविभागाचे हे ‘पाळीव’ वाघ चक्क महामार्गावर बंदूक रोखून उभे ठाकले आहेत की काय, असा संतप्त सवाल नांदेडच्या जनतेला पडला आहे. ज्यांच्या हातात कायद्याने रक्षणाची काठी दिली, त्यांनी चक्क बेकायदेशीर ‘अग्निशस्त्र’ काढून गरिबांच्या छातीवर रोखले आणि ५० हजारांची खंडणी वसूल केली! हा प्रकार म्हणजे सरकारी ड्युटी नसून, खाकी वर्दीत केलेली निव्वळ ‘रस्तालूट’ आहे!

कार्यक्षेत्राबाहेरचा ‘अघोरी’ पराक्रम!

घटना घडली ११ मार्च रोजी, कुपटी ते पाचोंदा राज्यमार्गावर. किनवटचे वन परीक्षेत्र अधिकारी (RFO) श्री. राठोड आणि चिखलीचे वनपाल कोम्पलवार या जोडगोळीला अचानक ‘कार्यक्षेत्रा’चा विसर पडला. माहूरच्या हद्दीत शिरून, एका खाजगी वाहनाने पाठलाग करत या महाशयांनी ट्रॅक्टर चालक दीपक करपते याला अडवले. अत्रेंच्या भाषेत सांगायचे तर, ही कसली वनसेवा? ही तर निव्वळ ‘दादागिरी’ आहे!

“सांगतो तसे बोल, नाहीतर अवघड जागी गोळी घालीन!”

सरकारी अधिकाऱ्याच्या तोंडी ही भाषा शोभा देते का? या मद्यधुंद अधिकाऱ्यांनी केवळ ट्रॅक्टर अडवला नाही, तर चालकाच्या कानशिलाला पिस्तुल लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. “मी रेती चोरली आहे” असे खोटे कबुली देणारे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याला ब्लॅकमेल केले गेले. जप्तीची आणि तुरुंगाची भीती दाखवून, अखेर ५० हजार रुपयांची ‘सुपारी’ घेतल्यासारखी रक्कम लाटण्यात आली. ही ५० हजारांची मलिदा कोम्पलवार यांनी स्वीकारल्याचे तक्रारीत स्पष्ट नमूद आहे.

कॉ. शंकर सिडाम यांचा रणशिंग!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम यांनी या अन्यायाविरुद्ध कंबर कसली आहे. उप वनसंरक्षक केशव वाबळे यांच्याकडे १७ मार्च रोजी लेखी तक्रार देऊन त्यांनी या भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचा बुरखा फाडला आहे. “दारूच्या नशेत धुंद होऊन, विनापरवाना पिस्तुल नाचवत लूटमार करणाऱ्या या ‘वनराजांना’ तात्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत,” अशी आक्रमक मागणी सिडाम यांनी केली आहे.

आमचा सवाल आहे प्रशासनला:

कायद्याचे रक्षकच जर रस्त्यावर दरोडे टाकू लागले, तर जनतेने दाद कोणाकडे मागायची? या दोन्ही अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना घरचा रस्ता दाखवणार की नाही? जर तातडीने कारवाई झाली नाही, तर लाल बावट्याच्या वतीने नांदेडचा रस्ता जाम केला जाईल, असा इशारा आता देण्यात आला आहे!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!