शासकीय दरबार भरला जनतेच्या दारी ! दापिवली मंडळात सेवांचा जागर ; एकाच छताखाली शेकडो स्वप्नांना ‘प्रमाणपत्र’ !
— सुनील पाटील,
पनवेल | १७ एप्रिल २०२
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा ‘टप्पा क्रमांक १’ सध्या पनवेलच्या ग्रामीण भागात लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण करत आहे. अपर तहसील पनवेल यांच्या कार्यक्षेत्रात आयोजित या सेवायज्ञाचा चौथा मुक्काम आज दापिवली महसूल मंडळातील चावणे ग्रामपंचायतीत पार पडला. सकाळी १० वाजल्यापासूनच नागरिकांच्या रांगा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची तत्परता यामुळे या शिबिराला एका उत्सवाचे स्वरूप आले होते.
महसूल आणि प्रशासनाचा लोकशाही सन्मान
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच श्री. विजय शेठ मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती अनन्या अविनाश गाताडे, पंचायत समिती सदस्य राजू पाटील, मयुर शेलार, अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे आणि निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार , संदीप पाटील यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना जागेवरच दाखल्यांचे वाटप करण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
एकाच छताखाली ‘समाधान’
या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महसूल, भूमी अभिलेख आणि महावितरण यांसारखे विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध होते.
-
महसूल विभाग: उत्पन्न, जातीचे दाखले, ७/१२ दुरुस्ती आणि फेरफार प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली.
-
भूमी अभिलेख: उपअधीक्षक श्रीमती वैशाली जाधव यांनी ‘ई-मोजणी २.०’ आणि ‘महाभुमी’ पोर्टलद्वारे डिजिटल सातबारा कसा मिळवावा, याचे मार्गदर्शन केले.
-
महावितरण: कनिष्ठ अभियंता विकास कांबळे यांनी ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेची माहिती देऊन वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या.
३८२ अर्जांचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा
आजच्या शिबिरात एकूण ३८२ अर्ज प्राप्त झाले, ज्यामध्ये १५८ उत्पन्न दाखले आणि ११४ जातीच्या दाखल्यांचा समावेश होता. यासोबतच आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आरोग्य कार्डांसाठीही विशेष स्टॉल्स लावण्यात आले होते. केवळ कागदपत्रेच नाही, तर ‘साई रक्तपेढी’च्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीही जपली गेली.
“प्रशासनाने जनतेच्या दारात येऊन काम करणे, हीच खरी लोकशाही आहे. चावणेतील नागरिकांचा प्रतिसाद आणि अधिकाऱ्यांची कामाची पद्धत यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे.”
— जितेंद्र इंगळे, अपर तहसीलदार, पनवेल
हर्षद सोनावणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. दापिवली मंडळातील सर्व मंडल अधिकारी, तलाठी, सेतू केंद्र कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे चौथे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.



























