तंत्रज्ञानाचा वापर नाते जपण्यासाठी…


तंत्रज्ञानाचा वापर नाते जपण्यासाठी…

डॉ. तुषार निकाळजे

हल्लीचे आयुष्य जलद, स्पर्धात्मक आणि धकाधकीचे झाले आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, घरातील जबाबदाऱ्या आणि दैनंदिन धावपळ यामुळे लोकांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी पूर्वीसारखा वेळ मिळत नाही. त्यामुळे नातेवाईक, मित्र आणि शेजारी यांच्याशी होणारा प्रत्यक्ष संपर्क कमी झाल्याची भावना अनेकांना वाटते.

पूर्वी सणासुदीला, यात्रांच्या निमित्ताने किंवा गावातील जत्रांमध्ये मैदानावर कापडी पडद्यावर चित्रपट दाखवले जात. नाटक, तमाशा, कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण गाव एकत्र येत असे. त्या निमित्ताने नातेवाईकांची भेट, गप्पा, हास्यविनोद आणि आपुलकीचे क्षण अनुभवायला मिळत. समाजातील एकोप्याला अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मोठे बळ मिळत असे.

आता याचे प्रमाण कमी झाले आहे. आज परिस्थिती बदलली असली तरी माणसांच्या भावना बदललेल्या नाहीत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संवादाची साधने अधिक व्यापक झाली आहेत. मोबाईल, संगणक, व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स यांमुळे दूर असलेली माणसेही क्षणात एकमेकांशी जोडली जातात. परदेशात किंवा दुसऱ्या शहरात राहणाऱ्या नातेवाईकांशी रोज संपर्क साधणे आज सहज शक्य झाले आहे. कौटुंबिक समारंभ, वाढदिवस, सण, शुभेच्छा आणि आनंदाचे क्षण आता डिजिटल माध्यमातूनही एकमेकांपर्यंत पोहोचतात. अनेक कुटुंबांचे व्हॉट्सअॅप गट, व्हिडिओ कॉलवरील कौटुंबिक भेटी आणि सोशल मीडियावरील संवाद यांमुळे नाती टिकून राहण्यास मदत होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनाही मुलांशी आणि नातवंडांशी नियमित संपर्क ठेवणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.

तंत्रज्ञान हे नात्यांचा पर्याय नाही; परंतु ते नाती जपण्याचे प्रभावी साधन नक्कीच आहे. त्याचा सकारात्मक वापर केल्यास संवाद वाढतो, गैरसमज कमी होतात आणि दूर अंतर असूनही माणसे भावनिकदृष्ट्या जवळ राहू शकतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाला दोष देण्यापेक्षा त्याचा समतोल आणि संवेदनशील वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. काळ बदलला तरी नात्यांची गरज कायम आहे. पूर्वी लोक मैदानात एकत्र येत असत, आज ते मोबाईलच्या पडद्यावर भेटतात. माध्यम बदलले असले तरी माणुसकी, आपुलकी आणि संवाद यांची किंमत तितकीच महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक स्वीकार करून आपण नाती अधिक दृढ, जिव्हाळ्याची आणि काळानुरूप सक्षम बनवू शकतो.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!