विद्यामंदीर की समस्यांचा डोंगर? मनपा उर्दू शाळांची दैना; आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पुणे: पुण्यातील मध्यवस्ती भागात असणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या उर्दू शाळांची प्रचंड दुरावस्था झाली असून, शाळांमध्ये समस्यांचे जाळे पसरले आहे. शिक्षण हक्क मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच या शाळांना सदिच्छा भेट देऊन पाहणी केली असता, महापालिकेचा या शाळांकडे असलेला दुर्लक्षपणा उघडा पडला आहे.
गणेश पेठ व रविवार पेठ, मीरा दातार दर्गा जवळील पुणे महानगरपालिका उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळा (क्र. १२ जी व १० बी) आणि सर सय्यद अहमद खान उर्दू विद्यानिकेतन (क्र. ३) या शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
**शाळांमधील गंभीर समस्या:**
* **घुशींचा सुळसुळाट व भिंतींना भगदाडे:** शाळांच्या काही भागांमध्ये घुशींनी ठिकठिकाणी खड्डे करून वर्गखोल्या पोखरल्या आहेत. अनेक ठिकाणी भिंतींना भगदाडे पडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
* **स्वच्छतागृह व विजेची दुरावस्था:** मुलींच्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट असून, विजेचे बोर्ड, तुटलेली दारे, खिडक्या आणि वायरिंगची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.
* **इतर सोयीसुविधांचा अभाव:** पटांगणातील स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे, नवीन पोल बसवणे, पाण्याची टाकी बसवणे, रंगरंगोटी आणि शाळेच्या लोखंडी प्रवेशद्वाराला कलर देणे आवश्यक आहे.
* **शाळेचा नामफलक:** शाळेच्या दर्शनी भागातील पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचा नावाचा बोर्डही नवीन बसवण्याची मागणी केली जात आहे.
या सर्व प्रकाराबाबत कसबापेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जंगले साहेब व उप अभियंता अनवर मुल्ला साहेब यांची भेट घेऊन गांभीर्याने निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे प्रदेश मुख्य संघटक तथा शिक्षण हक्क मंचचे विभागीय अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर) यांनी उर्दू शाळांसाठी वाढीव बजेट मंजूर करून सर्व किरकोळ कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याची ठाम मागणी केली.
येत्या आठ दिवसांत पालिकेने यावर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर कसबापेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा फिरोज मुल्ला (सर) यांनी दिला आहे.
या पाहणी दौऱ्यात छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे, प्रभारी महिला अध्यक्ष अस्माआपा शेख, मीडिया इन्चार्ज सारा सौदागर, कोर कमिटी सदस्य दौलाभाई पिरजादे, बागअली गोकाक, शैक्षणिक कार्यकर्ते साजिद शेख आदी उपस्थित होते. शिक्षण हक्क मंचाचे संस्थापक अध्यक्ष मतीन मुजावर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष चांदभाई बळबट्टी यांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा पार पडला.




























