पुण्यात मेडिकल व्यवसायाच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक; पीडित व्यावसायिकाची पोलिसांत धाव


पीडिता तर्फे अँड साजिद ब शाह न्यायालयीन काम पाहत आहेत

पुणे: मेडिकल व्यवसाय सुरू करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाला तब्बल २० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तौसीफ नबी खान नावाच्या पीडित व्यावसायिकाने पुणे पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज मेडिकल’च्या नावाखाली फसवणूक

तक्रारीतील माहितीनुसार, आरोपींनी “राज मेडिकल” या नावाने नवीन मेडिकल दुकान सुरू करण्याचे आमिष फिर्यादी तौसीफ खान यांना दाखवले होते. या व्यवसायात मोठी आर्थिक मिळकत होईल, असा विश्वास सुरुवातीला आरोपींनी खान यांना दिला. हाच विश्वास संपादन करून आरोपींनी मेडिकल दुकानाची गुंतवणूक, शासकीय परवाने दुकानाचा माल खरेदी आणि इतर व्यवस्थापकीय खर्चाच्या बहाण्याने खान यांच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली.

धनादेश रखडले ; आरोपी फरार

पीडित खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आरोपींना दिलेली २० लाख रुपयांची रक्कम काही ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे तर काही रोख स्वरूपात दिली होती. काही काळाने खान यांनी आपल्या रकमेची आणि नफ्याची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना काही धनादेश दिले. मात्र, हे धनादेश बँकेत जमा केले असता ते ‘खात्यात पुरेशी रक्कम नसणे या कारणास्तव बाऊन्स झाले. त्यानंतर आरोपींनी खान यांचे फोन उचलणे बंद केले आणि आपली कार्यालये व व्यवसायाची ठिकाणे बदलून पळ काढला.

“माझी आर्थिक फसवणूक झाली असून आरोपींनी जाणीवपूर्वक माझा विश्वासघात केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत.”

— तौसीफ नबी खान, पीडित व्यावसायिक

पोलिस तपासाकडे लक्ष

मेडिकल क्षेत्रातील गुंतवणुकीच्या नावाखाली पुण्यात अशा प्रकारे मोठी फसवणूक झाल्याने व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिस प्रशासन आता काय पावले उचलणार आणि आरोपींना कधी बेड्या ठोकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पीडिता तर्फे अँड साजिद ब शाह न्यायालयीन काम पाहत आहेत


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!