कोंढव्यात काँग्रेसची ‘मुसंडी’; जनसंपर्काचा धडाका आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौल!
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक १९ (कोंढवा खुर्द – कौसरबाग) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथे प्रचाराने वेग घेतला असून, पदयात्रा आणि कोपरा सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कोंढव्यात ‘काँग्रेसमय’ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

भीम नगर, शिवनेरी नगरमध्ये दणदणीत स्वागत
प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात काँग्रेसच्या उमेदवारांनी भीमनगर आणि शिवनेरी नगर भागात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत उमेदवारांचे स्वागत केले. गेल्या काही वर्षांत नगरसेवक नसल्याने प्रशासनावर वचक उरला नाही आणि विकासकामे रखडली, अशी भावना येथील मतदारांमध्ये दिसून येत आहे.

उमेदवारांची ताकद आणि सामाजिक वारसा
काँग्रेसने या प्रभागातून अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांची सांगड घातली आहे:
तसलीम हसन शेख (१९ अ): स्वर्गीय हसन शेख (दीनदलितांचा कैवारी) यांचा सामाजिक वारसा त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचे सुपुत्र मोहसीन शेख यांनी आपल्या वडिलांचे समाजकार्य अत्यंत प्रभावीपणे पुढे नेले असून, त्यांच्यामुळे युवा वर्गात काँग्रेसची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे.
आशिया मणियार (१९ ब): सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने महिला वर्गात त्यांची पकड मजबूत आहे.
काशीफ सय्यद (१९ क): कोंढव्यातील स्थानिक प्रश्नांची जाण असलेला आणि सामाजिक कार्यात सतत सक्रिय असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
तहजीब मोईनुद्दीन सिद्दिकी (१९ ड): शांत, सुसंस्कृत आणि मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मतदारांची पसंती मिळत आहे.
सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष, बदलाचे वारे
महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रभाग १९ मधील अनेक नागरी समस्या प्रलंबित आहेत. सत्ताधारी माजी नगरसेवकांचा जनतेशी तुटलेला संपर्क आणि विकासाबाबतची उदासीनता यामुळे मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. हीच नाराजी आता काँग्रेसच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. विशेषतः शिवनेरी नगरमधील सभेत झालेली गर्दी विरोधकांची झोप उडवणारी ठरली आहे.
“कोंढव्याचा रखडलेला विकास आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. यंदा येथील जनता बदलाच्या मनस्थितीत असून आम्ही बहुमताने निवडून येऊ,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रचाराच्या सुरुवातीलाच काँग्रेसने घेतलेली ही झेप पाहता, प्रभाग १९ मध्ये यावेळी सत्तापरिवर्तन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


























