पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: संतोष पंडित यांची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका
पुणे : सत्ता आणि प्रशासनाच्या सर्वोच्च शिखरावर बसलेल्या लोकप्रतिनिधींच्या नावाने यूट्यूबवर वक्तव्ये केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले युट्यूबर संतोष पंडित यांना अखेर पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याचे आदेश देत पंडित यांची सुटका केली.
पुण्यातील ३६ वर्षीय सारिका कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली होती. राज्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्याच्या एका महिला नगरसेविकेबद्दल यूट्यूबवर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. यापूर्वी मुख्यमंत्र्यांबाबतही अशीच विधाने करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेशी संबंधित कलमे व आयटी अॅक्टच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करून पंडित यांना पोलीस व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
न्यायालयात सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, “संबंधित विधानांमागे कोणताही गैरहेतू किंवा महिलेचा अनादर करण्याचा उद्देश नव्हता. तसेच, लागू केलेल्या कलमांमधील शिक्षेची कमाल मर्यादा विचारात घेता आरोपीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही.”
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, संबंधित व्हिडीओ आणि पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, सरकारी पक्षाने व्यक्त केलेली भीती ही केवळ संशयावर आधारित असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन मंजूर केला. तथापि, पंडित यांनी फिर्यादीशी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा कडक अटी न्यायालयाने घातल्या आहेत.



























