दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्याचा निगडीत रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह; खाकी वर्दी सुन्न!


ड्रोनने शोधूनही लागला नव्हता सुगावा; शासकीय पिस्तुलाने संपवले जीवन, पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ

चंद्रशेखर पात्रे :

पिंपरी: कौटुंबिक वादविवादाच्या तणावातून पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या कर्मचाऱ्याचा मृतदेह आज सकाळी निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर बस डेपो परिसरात आढळून आल्याने संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

विजय कोळी असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ‘RTPC’ म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून विजय कोळी हे घरातून निघून गेले होते. मात्र, घरातून बाहेर पडताना त्यांनी स्वतःसोबत शासकीय पिस्तूलही नेले होते. ही गंभीर बाब समोर येताच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आणि त्यांचा तातडीने शोध सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान कोळी यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन निगडी येथील दुर्गादेवी टेकडी परिसरात दर्शवत होते. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण परिसरात शोधमोहीम तीव्र केली होती. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने टेकडीचा कोपरा अन् कोपरा पालथा घालण्यात आला, तरीही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.

दरम्यान, आज सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात एका पोलिसाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह विजय कोळी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ऐन सेवेत असलेल्या सहकाऱ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेमागचे नेमके कारण व पुढील परिस्थितीचा कसून तपास पोलीस करत आहेत

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!