‘ट्रिपल इंजिन’ची सत्ता आणि अतिक्रमणाचा खेळ; मुकुंद किर्दत यांनी काढले भाजपच्या भूमिकेचे वाभाडे
पुणे: शहरातील मध्यवर्ती आणि सुशिक्षित भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीचे (आप) नेते मुकुंद किर्दत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे. केंद्र, राज्य आणि महापालिका अशा तिन्ही स्तरांवर भाजपची ‘ट्रिपल इंजिन’ सत्ता असताना, अतिक्रमणाविरोधात सत्ताधारी नगरसेवकांनीच आंदोलन करणे हा एक विरोधाभास असल्याचे किर्दत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
**सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह**
मुकुंद किर्दत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, महानगरपालिकेच्या चर्चेत फर्ग्युसन रोडवरील अतिक्रमणाचा विषय समोर आला असता सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी आंदोलन केले. नागरिक आपल्यावरच ‘हप्ते’ घेतल्याचा आरोप करत असल्याचे खुद्द त्याच नगरसेवकांनी चर्चेदरम्यान मान्य केले, याकडे किर्दत यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या परिसरात बांगलादेशी नागरिक अतिक्रमण करत असल्याचा दावा केला होता. यावर भाष्य करताना किर्दत यांनी म्हटले की, स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे विधानसभेत हा प्रश्न मांडत असतील आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आलेले असताना, हा विषय थेट त्यांच्यासमोर मांडायला हवा होता. स्वतःची सत्ता असताना असे आरोप करणे हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली.
**कारवाईचा दिखावा आणि प्रशासनाची भूमिका**
बीएमसीसी रोड, फर्ग्युसन रोड, आपटे रोड आणि मॉडेल कॉलनी या भागातील पुणेकर अत्यंत सजग असल्याचे सांगत किर्दत यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, दर सोमवारी अतिक्रमण विभागाची गाडी येते आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. पालिकेत या विषयावर चर्चा सुरू असतानाच अतिक्रमण विभाग अचानक सक्रिय झाला; मात्र, कारवाई होण्यापूर्वीच फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन आणि फुटपाथवरील व्यावसायिकांना कारवाईचा निरोप पोहोचला. त्यामुळे व्यावसायिकांनी तातडीने आपला माल आणि स्टॉल हलवले. परिणामी, दुपारी बरोबर दोन वाजता जेव्हा महापालिकेच्या गाड्या तिथे पोहोचल्या, तेव्हा संपूर्ण रस्ता रिकामा आणि ‘ठीकठाक’ झाला होता, असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला आहे.






























