रायगड अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई! गावठी कट्टे विक्रीसाठी आलेला आरोपी जेरबंद
नव्याने पदोन्नती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पीएसआय राजेश पाटील यांची धडाकेबाज कारवाई
दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि एर्टिगा कारसह ७ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त
सुनील पाटील
खालापूर : गावठी बनावटीचे पिस्तूल (कट्टे) विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि एक एर्टिगा कार असा एकूण ७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) राजेश पाटील यांना प्रीती पॅलेस हॉटेलसमोर, जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत एक इसम गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि एर्टिगा कार (क्रमांक MH46CY4300) आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ७ लाख ५२ हजार रुपये आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी
शुभम उल्हास पाटील (वय २८ वर्षे), व्यवसाय – चालक, रा. पार आळी, शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीचा पूर्वइतिहास : पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे यापूर्वी गुन्हा नोंद असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
कारवाईत सहभागी पोलीस पथक
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, हेड कॉन्स्टेबल रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे, मनोहर सिरतार तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप खरात यांनी सहभाग घेतला.
गोपनीय माहितीच्या आधारे योग्य नियोजन करून पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रविक्रीच्या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कारवाई झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




























