मुंबईत कलेचा लख्ख प्रकाश ! ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या मुलाखतीत उलगडले चित्रकार डॉ. सुभाष बाभुळकर यांच्या कुंचल्यामागचे गुपित
संदीप भाऊ शेंडगे
मुंबईच्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या वातानुकूलित दालनात सध्या कलेचा असा काही सप्तरंगी पाऊस पडतोय की, ज्याने बघणाऱ्यांच्या मनातील जुनाट कोलाहल क्षणभर शांत व्हावा. निमित्त होतं, ख्यातनाम चित्रकार प्रो. डॉ. सुभाष बाभुळकर यांच्या कॅनव्हास पेंटिंग्जच्या दिमाखदार प्रदर्शनाचं!
या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे उमदे पत्रकार संदीपभाऊ शेंडगे यांनी बाभुळकर यांच्याशी केलेली खास मुलाखत म्हणजे जणू कलेच्या मर्मवर पडलेला लख्ख प्रकाशच आहे. याप्रसंगी कलाविश्वातील जाणकार शशिकांत रायबोले सर आणि मिलिंद गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती.
माणूस नावाचा प्राणी जेव्हा काँक्रीटच्या या जंगलात धावपळ करतो, तेव्हा त्याच्यासोबत पाठीशी असणारे मुके पक्षी, प्राणी आणि या आधुनिक शहरी जीवनाचा पोत नेमका कसा आहे, याचा अस्वस्थ करणारा शोध बाभुळकरांच्या कुंचल्याने घेतला आहे. आपल्या अभिव्यक्तीपूर्ण, सहजसुंदर आणि तितक्याच प्रभावी रेषांच्या माध्यमातून त्यांनी शहरातली खंडित आणि गतिमान मानवी मनःस्थिती कॅनव्हासवर उतरवली आहे.
पारंपारिक रेखीव चित्रांच्या चौकटी मोडून काढत, मानवी आकार आणि प्राण्यांच्या हालचालींचा एक अद्भूत संगम या कलाकृतींमध्ये पाहायला मिळतो. माणसाची जगण्याची धडपड, सततची सतर्कता, येणारी असुरक्षितता आणि या संपूर्ण जीवनसृष्टीचं अस्तित्व एकाच सूजात कसं गुंफलेलं आहे, याची साक्ष ही चित्रं देतात.
शहरातले ते न संपणारे पावलांचे आवाज, गाड्यांचा कर्णकर्कश गोंगाट आणि धावपळीचे क्षणात बदलणारे संदर्भ बाजूला सारून, बाभुळकरांनी या धडपडीमागील संवेदनेला वाचा फोडली आहे. दैनंदिन गर्दीत आपल्याकडून जे सूक्ष्म परस्परसंवाद दुर्लक्षित होतात, त्यांना जिवंत करणे हाच या कलाकृतीमागचा मुख्य हेतू असल्याचे डॉ. बाभुळकर यांनी या मुलाखतीत आवर्जून सांगितलं.
खरं तर, काँक्रीटच्या या अवाढव्य मुंबईत जगताना आपण सगळेच यंत्र बनलो आहोत. पण या चित्रांकडे पाहिल्यावर वाटतं, अरे बापरे! आपण अजूनही माणसंच आहोत आणि आपल्याभोवती एक संवेदनशील जग अस्वस्थपणे श्वास घेत आहे. आपल्याच शहराकडे, आपल्या जगण्याकडे एका पूर्णपणे नव्या आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहण्याची ताकद डॉ. बाभुळकर यांच्या या कुंचल्यात आहे. कलेच्या या स्पंदनांना आणि संवेदनशील मनाच्या चित्रकाराला आमचा त्रिवार मुजरा!




























