भारतीय नौदलात नियुक्ती झाल्याने देहुरोडच्या श्रेयस शेंडे यांचा ‘मानव आधार सामाजिक संघा’तर्फे सत्कार

देहुरोड (प्रतिनिधी – चंद्रशेखर पात्रे):
भारतीय नौदलात नियुक्ती होणे हे प्रत्येक नवयुवकाचे स्वप्न असते, परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफाट जिद्द आणि चिकाटीची आवश्यकता असते. मागील १४ वर्षांपासून अथांग कष्ट घेत आणि अनेक संकटांवर मात करत देहुरोड येथील श्रेयस संजय शेंडे यांनी भारतीय नौदलात आपली निवड निश्चित केली आहे. येत्या २४ सप्टेंबर २०२६ रोजी ते आपल्या ट्रेनिंग व देशसेवेसाठी प्रस्थान करणार आहेत. या दैदिप्यमान यशाबद्दल ‘मानव आधार सामाजिक संघ’ यांच्या वतीने देहुरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वारासमोरील संविधान फलकाजवळ श्रेयस शेंडे यांचा आदर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर यांच्या हस्ते नवनियुक्त श्रेयस शेंडे यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात धम्मभूमी देहूरोड सामाजिक संघाचे अध्यक्ष के. एच. सूर्यवंशी यांनी श्रेयस यांच्या १४ वर्षांच्या खडतर प्रवासाची आणि मेहनतीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी लायन्स क्लब देहूरोड असोसिएशनचे अध्यक्ष राजाराम अस्वरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पवार, मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास आणि संविधान सन्मान संघाचे सदस्य चंद्रशेखर पात्रे यांनी आपले विचार मांडले. देहुरोडसारख्या शहरातून एका होतकरू नवयुवकाची भारतीय नौदलात झालेली निवड ही संपूर्ण शहरासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद असून, नवीन पिढीसाठी ती अत्यंत प्रेरणादायी आहे, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
‘मानव आधार सामाजिक संघा’चे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर बोलताना म्हणाले, “अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून आणि जिद्दीने उद्दिष्ट गाठणाऱ्या अशा गुणवंत नवयुवकांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीलाही प्रेरणा मिळत राहील.” त्यांनी श्रेयस यांना ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करून लवकरात लवकर देशसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, नेते शंकर तल्लारी, रामदास दासरी, हिरामण साळुंखे, संविधान सन्मान संघाचे मार्गदर्शक संजय आगळे, सलीम शेख, अशोक वाघमारे, ज्येष्ठ शिवसेना नेते विलास हिनकुले, बापू गायकवाड, समाजसेविका पुष्पा कांबळे, कविता कांबळे तसेच श्रेयस शेंडे यांचे माता-पिता शिल्पा शेंडे व संजय शेंडे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**आई-वडिलांमुळेच स्वप्नपूर्ती – श्रेयस शेंडे**
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्रेयस शेंडे अत्यंत भावुक झाले. “माझ्या या पूर्ण प्रवासात आई-वडिलांनी माझे मनोबल वाढवले आणि मला भक्कम पाठिंबा दिला. आज मी जे काही यश मिळवले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या आई-वडिलांनाच जाते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले.




























