बेटी बचाओ-बेटी पढाओ’चे प्रणेते ईश्वर अगरवाल यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कारा’साठी निवड

पुणे : देशात स्त्री भ्रूणहत्येविरोधात सर्वप्रथम आवाज उठवत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवणारे ख्यातनाम समाजभूषण **ईश्वर किसनलाल अगरवाल** यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कारा’साठी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
ईश्वर अगरवाल यांनी आपल्या ‘श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून शेकडो मुलींच्या नावे प्रत्येकी ५,००० रुपयांचे धनादेश देऊन त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया रचला आहे. याशिवाय अनेक गरजू मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलून त्यांनी स्त्री सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिला आहे.
केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या विकासासाठी भरीव अर्थसहाय्य करून त्यांनी सामाजिक समता आणि बंधुभाव जपण्याचे महान कार्य केले आहे. वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या या प्रदीर्घ व निष्कलंक योगदानाची दखल घेऊनच त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





























