पातळगंगेचा ‘नरक’ आणि एमआयडीसीचा ‘कुंभकर्ण’!


रस्त्यावर घाणीचे साम्राज्य ; अधिकाऱ्यांच्या नाकाचा शेंडा सुजलाय की काय ?

 विशेष प्रतिनिधी (सुनील पाटील) ।

‘गंगे’चे नाव उच्चारताच पवित्र वाटले पाहिजे, पण येथील ‘पाताळगंगे’च्या एमआयडीसी कार्यालयामागील रस्त्यावर गेलात, तर तुम्हाला पवित्रतेऐवजी केवळ ‘विष्ठे’चे आणि ‘कुजक्या मासां’चे दर्शन घडेल! एमआयडीसीच्या कार्यालयामागून रिलायन्स कंपनीकडे जाणारा रस्ता म्हणजे रस्ता नसून, तो नरकलोकाचा महामार्ग झाला आहे. रस्ते खराब होणे ही महाराष्ट्राची परंपरा आहेच, पण इथे तर रस्त्यांनी आणि कचऱ्याने ‘गळाभेट’ घेतली आहे!

चिकन सेंटरचा ‘प्रसाद’ अन् दुर्गंधीचा ‘दरवळ’!

येथील चिकन सेंटर चालकांनी आपल्या दुकानातील टाकाऊ कचरा, कोंबड्यांचे पाय, आतडे आणि पिसे या रस्त्यावर इतक्या प्रेमाने विखुरली आहेत की, तिथून चालताना ‘अहिंसा’ धर्माची आठवण यावी. त्यात भर पडली आहे ती औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या टाकाऊ कचऱ्याची ! हा सर्व कचरा सडून जो ‘सुगंध’ दरवळतो आहे, त्याने फोर-व्हीलर मधील माणसाचेही डोके भणाणून जाते. मग बिचारा पादचारी तिथे काय श्वास कोंडून ‘समाधी’ घेणार का ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

एमआयडीसीचे अधिकारी काय ‘ध्यान’ लावतायत?

आमचे एमआयडीसीचे साहेब आपल्या एसी केबिनमध्ये बसून नेमकी कसली ‘फाईल’ चाळत असतात? आपल्याच कार्यालयामागे काय चालले आहे, हे पाहण्याचे कष्ट घ्यायला यांना वेळ नाही. वर्षाला कंपन्यांकडून टॅक्स वसुली करताना यांचा हात थरथरत नाही, मग रस्ते दुरुस्त करताना आणि कचरा उचलताना यांच्या अंगात ‘आळस’ का भरतो? कॉन्ट्रॅक्टदारांना कामाचे पैसे मिळतात की फक्त आशीर्वाद? हा संशोधनाचा विषय आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह चा सवाल :

“साहेब, हा रस्ता ग्रामपंचायतीचा नाही, तुमच्या अखत्यारीतला आहे. ज्या खुर्चीत बसून तुम्ही हुकूम सोडता, त्या खुर्चीची मर्यादा तरी राखा! नागरिकांनी आणि कामगारांनी या नरकयातना किती दिवस भोगायच्या? जर हा रस्ता लवकर सुधारला नाही, तर या दुर्गंधीत बसून तुमची मीटिंग घेण्याची वेळ जनता आणल्याशिवाय राहणार नाही !”

आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांनी कॅमेऱ्यात कैद केलेली ही भीषण दृश्ये पाहून तरी ढिम्म प्रशासनाला जाग येईल का? की हे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असंच चालू राहणार ?

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!