मौत से किसकी यारी? आज हमारी, तो कल तुम्हारी !

प्रेस मीडिया लाईव्ह
मरण म्हणजे काय ? मरण म्हणजे या जगाचा कायमचा निरोप ! पण हा निरोप घेताना तुमची झोळी पुण्याची आहे की पापाची, याचा हिशोब नियती त्याच क्षणी पूर्ण करते. या जगात कुणी ‘मंत्री’ झाला, कुणी ‘शिक्षण सम्राट’ झाला, तर कुणी ‘साखर सम्राट’ म्हणून मिरवला. कुणी ‘चेअरमन’, कुणी ‘संचालक’, तर कुणी ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाची झूल पांघरली. पण लक्षात ठेवा, मृत्यूची सावली ज्या क्षणी तुमच्या उंबरठ्यावर पडते, त्या क्षणी तुमची ही सर्व पदं आणि प्रतिष्ठा मातीमोल ठरतात.
मृत्यूचं सर्वात मोठं आणि कडू सत्य हेच आहे की, तो कुणाशीही ‘रिश्तेदारी’ मानत नाही. ज्या नावाचा दबदबा अख्ख्या परिसरात होता, ते नाव मृत्यूच्या एका झटक्यासरशी पुसलं जातं. ज्याला कालपर्यंत लोक ‘साहेब’ म्हणून झुकून मुजरा करत होते, त्याच्या निधनानंतर लोक विचारतात, “मयत कधी उठणार?” किती ही भयानक विटंबना! ज्या नावाने ओळख कमावली, ते नाव क्षणात हरवून जातं आणि उरते ती फक्त एक ‘मयत’.
पण या प्रवासातला सगळ्यात थरकाप उडवणारा क्षण म्हणजे मरणापलीकडचा हिशोब ! माणसाच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या कामाची एक ‘अदृश्य ईडी (ED) इन्क्वायरी’ सुरू होते. इथल्या चौकशीत कदाचित तुम्ही वशिला लावून सुटला असाल, पण तिथल्या ‘ईडी’च्या फेऱ्यात मात्र कुणाचाही वशिला चालत नाही. तिथे तुमच्या कर्माचे हिशोब तपासले जातात. विशेष म्हणजे, मृत्यूनंतर तुमचं राजकारण चालत नाही! तिथे युती नसते, आघाडी नसते की फोडाफोडीचं राजकारण नसतं.
अहो, एखाद्या गरिबाचा, लाचार माणसाचा ‘तळतळाट’ घेऊन कधीही जगू नका. सत्तेच्या किंवा पदाच्या खुर्चीवर बसलात म्हणून जर तुम्ही एखाद्याला काम करतो म्हणून शब्दाचं आश्वासन दिलं असेल, तर ते पूर्णच करा! जर तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही, तर तो तळतळाट तुमचा पिच्छा कधीच सोडणार नाही. लक्षात ठेवा, माणसाला दिलेला शब्द जर तुम्ही या जन्मात पूर्ण केला नाही, तर मेल्यानंतरही तो फेडावाच लागतो! म्हणूनच सांगतो, आयुष्यात फक्त चांगले कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा कधीही ठेवू नका. जेव्हा आपण निरपेक्ष भावनेने कोणाचे तरी भले करतो, तेव्हा तो हिशोब निसर्ग स्वतः मांडत असतो. आयुष्याच्या या प्रवासात नेहमी सत्याची भागीदारी करा. बाकी सगळं वैभव, या गाड्या, हे बंगले इथेच पडून राहणार आहेत. जेव्हा आपला प्रवास संपतो, तेव्हा आपण मागे काय ठेवून जातो? शेवटी मरण असं असावं की, आपण गेल्यावर जगाने हळहळावं, पण नियतीने आपल्याला आनंदाने मिठी मारावी.
ज्यावेळी आपली ‘मयत’ चार खांद्यांवरून निघेल, तेव्हा लोकांच्या तोंडी तुमची पदं नसावीत, तर तुमच्या आठवणींचा सुगंध असावा. “आज आमची, तर उद्या तुमची बारी!” हे विसरू नका. पण ही बारी येण्यापूर्वी कुणाचं तरी आयुष्य गोड करा, कुणाचं तरी अडलेलं काम पूर्ण करा. कारण स्मशानातील राखेत ना कुणी मंत्री असतो, ना कुणी अध्यक्ष; तिथे उरते ती फक्त तुमची ‘माणुसकी’, तुमची ‘चांगली कर्मे’, तुमच्या ‘शब्दाची पुण्याई’ आणि तुम्ही आयुष्यभर जपलेलं ‘सत्य’!


























