आधीच कर्नाटकची नजर, त्यात ‘राधाकृष्ण’चा मारा… नद्या कोरड्या पाडण्याचा हा कसला ‘विकास’?


इचलकरंजीच्या ८९ एमएलडी योजनेला दानवाड ग्रामस्थांचा कडाडून विरोध; ‘पाणी जिरवण्या’आधी आंदोलन पेटणार..

नवे दानवाड | २० जुलै २०२६

इचलकरंजी शहराची तहान भागवणं ही एका बाजूला पुण्याची गोष्ट वाटत असली, तरी दुसऱ्या बाजूला शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीची शेती ‘कोरडीठाक’ करून ती भागवायचा घाट प्रशासनाने घातला आहे! इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रस्तावित ८९ एमएलडी ‘राधाकृष्ण पाणी पुरवठा योजने’वरून सध्या कृष्णा-दूधगंगेच्या काठावर चांगलाच ‘जलआक्रोश’ पेटला आहे.

“अहो, आमच्या हक्काच्या पाण्यावर आणि शेतीच्या अस्तित्वावरच गदा आणताय? आम्ही काय फक्त नदीपात्रातील वाळू आणि कोरडे खडक पाहायला उरलोय का?” असा सवाल करत ‘राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती’ने सांगली पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महादेव कदम यांच्या हातात थेट विरोधाचे ‘निवेदन बॉम्ब’ सोपवले आहे. या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगली अधीक्षक अभियंता आणि शिरोळ तहसीलदार यांनाही निवेदने देऊन विरोधाचा नारळ फोडण्यात आला.

विरोधाची ‘खमंग’ कारणे: योजना एक, आक्षेप अनेक !

अडचण अशी आहे की, आधीच शेजारी कर्नाटकाची ‘महालक्ष्मी योजना’ आपल्या नद्यांतून पाणी पिऊन बसली आहे. त्यात आता ही नवी ‘राधाकृष्ण योजना’ आली, तर उन्हाळ्यात कृष्णा आणि दूधगंगा नद्यांमध्ये पाण्याऐवजी फक्त ‘धूळ’ उडताना दिसेल! काळम्मावाडी प्रकल्पासाठी जमिनी आम्ही द्यायच्या आणि उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी पाटी-तांब्या घेऊन आम्हीच पळायचं? हा कसला न्याय आणि कसला विकास? असा खडा सवाल स्थानिक शेतकरी विचारत आहेत.

जुने आणि नवे दानवाड, दत्तवाड, सै. टाकळी, घोसरवाड, राजापूरवाडी आणि खिद्रापूर… या गावांच्या जगण्याचा ‘श्वास’ आणि शेतीचा ‘ध्यास’ म्हणजे या दोन नद्या! पाणीच राहिलं नाही, तर भूजल पातळी पाताळात जाईल नि शेतकरी रस्त्यावर येईल. त्यात उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडल्या की, सीमावर्ती भागात पाण्यासाठी नवीन ‘जलतंटा’ सुरू व्हायला वेळ लागणार नाही!

आंदोलनाचा पवित्रा: आता ‘विनंती’ नाही, थेट ‘आक्रोश’!

स्थानिक ग्रामसभांनी आधीच विरोधाचे ठराव मंजूर करून प्रशासनाला स्पष्ट कल्पना दिली आहे. जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे कायदेशीर हरकतींचे डोंगर उभे केले आहेत.

प्रशासनाला अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे — “ही योजना कायमस्वरूपी रद्द करा, अन्यथा साखळी उपोषण आणि तीव्र जनआंदोलनाला तोंड द्यायला तयार राहा!”

हे निवेदन सादर करताना लोकनियुक्त सरपंच सी. डी. पाटील, ॲड. राहुलराज कांबळे, माजी सरपंच संजय धनगर, संतोष आठवले, श्रावण कांबळे, शिवानंद माळी, सद्दाम सनदी, सज्जनसिंग राजपूत, सुकुमार पाटील, मारुती कांबळे, सागर परिट, सदाशिव गिड्ड, महादेव बेरड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते

प्रशासन ‘थंड’ आणि गावकरी ‘गरम’!

सध्या तरी प्रशासनाने तोंडावर बोट ठेवून ‘शांततेचे व्रत’ स्वीकारले आहे, कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु, इचलकरंजीची पिण्याची तहान आणि दानवाडची शेती वाचवण्याची लढाई, यात नक्की कोणाचा ‘विजय’ होतो आणि कोणाचे पाणी ‘जिरते’, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे!

#RadhakrishnaPaniYojna #Danwad #Shirol #Ichalkaranji #SangliNews #JalAkrosh #FarmerProtest #KrishnaRiver #DudhgangaRiver #PressMediaLive #KolhapurNews #MaharashtraNews #SaveWaterSaveFarmers


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!