बोललात तर जेल, विरोध केला तर मारहाण!’ — पुण्यात वाढत्या हुकूमशाहीविरोधात ‘आप’चा सडेतोड प्रहार!


बोललात तर जेल, विरोध केला तर मारहाण!’ — पुण्यात वाढत्या हुकूमशाहीविरोधात ‘आप’चा सडेतोड प्रहार !

पुणे : संस्कृत आणि सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या आमच्या पुण्यात सध्या राजकीय हवेचा दाब भलताच वाढला आहे! फरक एवढाच की, पूर्वी इथे विचारांच्या फैरी झाडल्या जायच्या, आता सरळ मुस्कटदाबी आणि गुद्द्यांची भाषा वापरली जातेय. सत्ताधाऱ्यांना दोन कडू प्रश्न विचारले की लगेच खाकी वर्दीची धावपळ सुरू होते आणि रात्री दीड वाजता काळ्याकुट्ट अंधारात अटकेचा ‘नाट्यप्रयोग’ रंगवला जातो! सामाजिक प्रश्नांवर रील बनवून प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना उघडे पडणारे संतोष पंडित सध्या याच ‘खास आदरातिथ्या’चे धनी ठरले आहेत.

ज्यांच्याबद्दल विधानं झाली, त्या मंत्री महोदयांची किंवा संबंधित नगरसेवकांची तक्रार नसताना, अचानक एखादा त्रयस्थ उठतो आणि कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो! ही तक्रार झाली कशी, की वरून सूत फिरवले गेले? असा जळजळीत सवाल करत आम आदमी पक्षाने या अटकेचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. ‘मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याचे लोकप्रतिनिधी आहेत की जुन्या काळातले कुणी व्हाइसरॉय?’ असा मार्मिक टोला मारत ‘आप’ नेत्यांनी, लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांचा गळा घोटणाऱ्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा चांगलाच पंचनामा केला आहे.

कथा इथेच संपत नाही! तक्रार करा किंवा प्रश्न विचारा – शिक्षा अटळ आहे. नगरसेवक अमोल बालवडकरांनी निधीवर बोट ठेवले, तर त्यांच्या प्रभागाचा निधीच गायब करण्यात आला. पंडित यांनी ओपन जिमच्या फुगवलेल्या बजेटचा हिशोब मागितला, तर थेट कोठडीची हवा दाखवली गेली. आणि दुसरीकडे? वाढीव आवाजाच्या डीजेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर थेट झुंडशाहीचा प्रयोग करून मारहाण केली जाते!

  1. “मुद्याची उत्तरं द्यायला अक्कल आणि हिंमत लागते, तिथे गुद्द्यांची भाषा वापरणं ही नपुंसक राजकीय प्रवृत्ती आहे,” अशा शब्दांत ‘आप’चे डॉ. अभिजित मोरे, अमित म्हस्के आणि सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी, सत्तेची मस्ती आणि पोलिसांचा दुरुपयोग करून पुण्याचा ‘बिहार’ करू पाहणाऱ्यांना पुणेकर जनता वेळेवर योग्य ते उत्तर देईल, असा इशाराही या निमित्ताने देण्यात आला आहे.

थोडक्यात काय तर, सध्या पुण्यात काय चाललंय? ‘तुम्ही फक्त कर भरा, तोंड उघडाल तर तुरुंगात मरा!’ असाच काहीसा कारभार सुरू आहे.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!