घटनेने दिला अधिकार, सरकारने दिली लाठी!


शांततामय आंदोलनावर मोदी सरकारची दडपशाही; दीप्ती चौधरींचा घणाघात

पुणे : नवी दिल्ली येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपले गऱ्हाणे मांडण्याचा घटनात्मक अधिकार दिला आहे. मात्र, या लोकशाही अधिकारांचा संकोच करत नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला व अश्रूधूर सोडल्याचा प्रकार घडला आहे.

ज्येष्ठ पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लाखो विद्यार्थी गेल्या तीन आठवड्यांपासून नवी दिल्लीत शांततामय व अहिंसक मार्गाने आंदोलन करत होते. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या या तरुणांशी सरकारने संवाद साधून मार्ग काढणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षणमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड पोलीस बळाचा वापर करून विद्यार्थ्यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.

शासनाच्या या दडपशाही आणि अमानुष कारवाईचा पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पश्चिम विभाग अध्यक्षा दीप्ती चौधरी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

“ज्या तरुणांच्या हाती शिक्षणाची साधने आणि रोजगाराची पत्रे असायला हवी होती, त्या तरुणांवर नवी दिल्लीत लाठ्या चालवल्या जात आहेत. शांततापूर्ण मार्गाने मांडलेला आवाज असा बळाचा वापर करून दाबणे हा संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा अवमान आहे. यावरून भाजप सरकारची जनतेशी असणारी नाळ तुटल्याचे स्पष्ट होते.”

— दीप्ती चौधरी (अध्यक्षा, पश्चिम विभाग, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी)

देशाच्या भविष्याला चांगले शिक्षण, आरोग्य आणि रोजगार देण्याऐवजी त्यांच्या न्याय्य मागण्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या या धोरणांचा काँग्रेस पक्ष सदैव तीव्र विरोध करत राहील. सरकारने या दडपशाहीचा मार्ग सोडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!