फुटपाथ हडपणाऱ्या मिठाईवाल्यांवर कारवाई करा, नाहीतर ३ ऑगस्टला महापालिकेला टाळे ठोकणार!
सुनील पाटील
पनवेल: शहरातील वाढती बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांवर व पादचाऱ्यांच्या फुटपाथवर झालेले अक्राळविक्राळ अतिक्रमण आणि यामुळे सामान्य पनवेलकरांच्या जिवाशी होणाऱ्या खेळाविरोधात मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांनी थेट प्रशासनाविरुद्ध शिंग फुंकले आहे. शिष्टमंडळाने थेट पालिका आयुक्तांना घेराव घालत मागण्यांचे रोखठोक निवेदन सादर केले. येत्या २ ऑगस्ट २०२६ पर्यंत या बेकायदेशीर प्रवृत्तींवर ठोस कारवाई झाली नाही, तर सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता पालिकेच्या मुख्य वेशीवर धडक मोर्चा धडकणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीच्या निमित्ताने पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा एक अत्यंत गंभीर आणि भ्रष्ट कारभार पुराव्यासह उघडकीस आणण्यात आला आहे. उरण नाका, तक्का, एस.टी. बस डेपो, नवीन पनवेल आणि वडाळे तलाव परिसरात सायंकाळच्या वेळी मुख्य रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या बेकायदेशीर आईस्क्रीम गाड्यांवर पालिका प्रशासन मेहरबान का असते, याचे गुपित उघड झाले आहे. अतिक्रमण विभागातील काही कर्मचारी दर महिन्याला या गाड्यांवरून कारवाई टाळण्यासाठी हप्ते लाटत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या लाचखोरीचे थेट व्हिडिओ पुरावेच शिष्टमंडळाने आयुक्त यांच्या सुपूर्द केल्याने पालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
निवेदनातील मुख्य आणि आक्रमक मागण्या:
१. मार्केट यार्डातील बेकायदेशीर गोडाऊनवर बुलडोझर फिरवा: मार्केट यार्ड येथील प्लॉट क्र. ४८० येथे ‘एमआरटीपी’ (MRTP) कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अवाढव्य बेकायदेशीर गोडाऊनवर २ ऑगस्टपर्यंत निष्कासनाची ठोस कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा ३ ऑगस्टला पालिकेच्या दारात उग्र आंदोलन छेडले जाईल.
२. मिठाईवाल्यांची ‘फुटपाथ’वरील दादागिरी मोडून काढा: ‘मार्जिनल स्पेस’चा गैरवापर करून सामान्य पादचाऱ्यांचे फुटपाथ गिळंकृत करणाऱ्या बिकानेर, गिरनार, मिठास, ब्रिजवासी यांसारख्या नामांकित मिठाई विक्रेत्यांवर दंडात्मक व जप्तीची कडक कारवाई करावी, जेणेकरून जनतेला सुरक्षित रस्ता मिळेल.
३. वसुलीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई: ‘प्रभाग समिती ड’ मधील अतिक्रमण विभागातील कर्मचारी मोठ्या माशांना सोडून स्थानिक छोट्या गरीब व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत असून, अशा लाचखोर कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली?
पालिकेतील अंतर्गत अनागोंदी कारभारावर कडाडून बोट ठेवताना शिष्टमंडळाने विचारले की, अतिरिक्त आयुक्तांनी पाठवलेल्या अधिकृत पत्रांना प्रभाग अधिकारी आणि अधीक्षक उत्तर देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत, म्हणजेच प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही का? अशा मुजोर अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी स्वतः कडक कारवाई करावी. तसेच एका बिल्डरने टेरेसवर बांधलेल्या अनधिकृत फ्लॅटवरही तात्काळ कारवाईची मागणी लावून धरण्यात आली. आयुक्तांनी या सर्व विषयांवर सकारात्मक उत्तर दिले असले, तरी आता केवळ आश्वासनांची मिठाई चालणार नाही; प्रत्यक्ष कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून हिशोब चुकता करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
लढ्यात आघाडीवर असलेले शिष्टमंडळ:
या बैठकीचे नेतृत्व मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांनी केले.
त्यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर, राष्ट्रीय महासचिव गुरदीप सिंह, महाराष्ट्र सचिव निलेश भगत, पनवेल शहर अध्यक्ष आशिष मोहोकार, महिला तालुका अध्यक्षा नेहा किरनली, मुद्दसिर पटेल, ‘रायगडचा किल्लेदार’चे संपादक कृष्णा गायकवाड, ‘रायगडचा शिल्पकार’चे संपादक विकास पाटील, पत्रकार सुरज नागे, **प्रेस मीडिया लाईव्ह** रायगड जिल्हा उपसंपादक पत्रकार सुनील पाटील, ॲड. समीर कुंभार आदींसह अनेक पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























