घोसरवाडात आषाढी एकादशीचा अपूर्व सोहळा: घराघरांत उजळणार भक्तीचे दिवे अन् घुमणार ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर !


घोसरवाडात आषाढी एकादशीचा अपूर्व सोहळा: घराघरांत उजळणार भक्तीचे दिवे अन् घुमणार ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर !

घोसरवाड : आषाढी एकादशी म्हणाली की पंढरीची पायवाट, टाळांचा गजर आणि विठुरायाचे दर्शन! पण यंदा घोसरवाड गावाने भक्तीचा असा काही सुरेख आणि आपुलकीचा मार्ग निवडला आहे की, साक्षात पंढरपूरचा आनंदच प्रत्येक घोसरवाडकराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपणार आहे

विजय फडतारे यांनी अत्यंत जिव्हाळ्याने एक साद घातली आणि पाहता पाहता संपूर्ण घोसरवाड गाव या भक्तीच्या सूत्रात गुंफले गेले! येत्या शनिवारी, आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर संध्याकाळी ठीक सात वाजता गावातील प्रत्येक घरासमोर दोन पणत्यांची मंद प्रकाशज्योत उजळणार आहे. सोबतच, पांढऱ्याशुभ्र रांगोळीने अत्यंत आदराने ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे नाव घरोघरी साकारले जाणार आहे.

हा केवळ एक उपक्रम उरलेला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला एकत्र आणणारा एक आनंदोत्सव बनला आहे. संध्याकाळच्या या पवित्र वेळी प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन श्री सिद्धेश्वर आणि श्री विठोबा-रखुमाई देवीची भावपूर्ण आरती करणार आहेत. एकाच वेळी संपूर्ण गावातून येणारा आरतीचा सूर अन् टाळ्यांचा गजर गावाला एका वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात घेऊन जाईल.

विशेष म्हणजे, या सोहळ्यात गावातील सर्व तरुण मंडळे, सहकारी संस्था, पायी दिंडी समिती, माळकरी-भाविक, कष्टाळू शेतकरी राजा, लहान-मोठे व्यापारी आणि लाडक्या महिला भगिनी… सर्वजण अतिशय उत्साहाने सहभागी होत आहेत.

ज्या वेळी घरासमोर पणतीचा मिणमिणणारा दिवा उजळेल, दारात रांगोळीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’चे नामस्मरण दिसेल आणि घरातून सर्वांच्या मुखातून आरतीचा गोड आवाज येईल—तो क्षण प्रत्येक कुटुंबासाठी आणि संपूर्ण घोसरवाडसाठी खरोखरच असीम आनंदाचा आणि समाधानाचा ठरेल!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!