माणुसकीचा धन्वंतरी : अतिग्रेच्या ‘देवदूत’ डॉ. शंकर पाटील यांना राष्ट्रीय आरोग्य व समाजरत्न पुरस्कार!

भरत शिंदे : अतिग्रे
माणूस ज्या मातीत जन्माला येतो, त्या मातीचे ऋण फेडणे ही मोठी गोष्ट असतेच; पण ज्या मातीला तो कर्मभूमी मानतो, त्याच भूमीत स्वतःच्या सेवाभावाने ‘देवदूत’ बनून उभं राहणे, ही त्याहून मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे! हाच जिव्हाळा, हीच माणुसकीची आणि निरपेक्ष सेवेची ज्योत गेली २६ वर्षे सातत्याने तेवत ठेवणारे अतिग्रे (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मा. डॉ. श्री शंकर राघू पाटील (B.E.M.S.) यांच्या पाठीवर आता राष्ट्रीय कौतुकाची थाप पडली आहे.
मूळचे जनवाड (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील असणारे डॉ. शंकर पाटील हे गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ अतिग्रे गावालाच आपली कर्मभूमी मानून सेवा बजावत आहेत. गावात त्यांनी सुरू केलेले ‘श्री क्लिनिक’ हे केवळ औषधोपचाराचे दुकान राहिले नसून, ते गरिबांसाठी हक्काचे आश्रयस्थान आणि आशेचा किरण बनले आहे. “गरिबांना परवडणारी आणि श्रीमंतांनाही भावणारी” अशी त्यांची रुग्णांची सेवा आहे. आजच्या काळात जेव्हा वैद्यकीय क्षेत्र व्यापाराचे रूप घेत आहे, अशा वेळी ‘श्री क्लिनिक’ हे दातृत्वाचे आणि करुणेचे मंदिर ठरत आहे.
अतिग्रे गावाने डॉ. पाटील यांना केवळ एक डॉक्टर म्हणून पाहिलेले नाही, तर रात्री-अपरात्री हाकेला धावून येणारा ‘आपला हक्काचा देवदूत’ म्हणून मनात स्थान दिले आहे. दिवस असो वा रात्र, एका फोनवर अवघ्या पाच मिनिटांत रुग्णाच्या उशाशी हजर राहून मायेचा हात फिरवणारा हा डॉक्टर गावाने उराशी जपला आहे. त्यांच्या या सेवायज्ञात त्यांच्या सुविद्य पत्नी, ज्या स्वतः महाराष्ट्र शासनात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, त्यांची लाभलेली साथ म्हणजे जणू ‘सेवेचा सुवर्णयोग’च!
केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर गावातील सामाजिक आणि राजकीय पटलावरही डॉ. पाटील यांचा आदर्श सेवाभाव स्पष्ट दिसतो. सध्या सत्तेत असणाऱ्या शाहू आघाडीचे प्रमुख म्हणून काम करताना असो, किंवा भाजप तालुका मंडळ उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना असो; पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा आणि हक्कांचा लाभ मिळवून देण्यात ते सदैव तत्पर असतात. मोफत आरोग्य शिबिरे, डोळे तपासणी शिबिरे असोत की कोविडचा भयानक काळ… जेव्हा जग कुलूपबंद झाले होते, तेव्हा घरोघरी जाऊन रुग्णांना धीर देणारे आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. पाटील हेच अतिग्रेकरांसाठी ‘संजीवनी’ ठरले. त्यांच्या या कार्याची दखल रोटरी क्लबनेही यापूर्वी घेतली आहे.
आता या निरपेक्ष समाजरत्नाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर होत आहे. पुणे येथील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील आघाडीची वृत्तसंस्था आणि इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हॅट्रिक नोंदवणाऱ्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ तर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शंकर राघू पाटील यांची ‘राष्ट्रीय आरोग्य व समाजरत्न पुरस्कार २०२६’ साठी सन्मानपूर्वक निवड करण्यात आली आहे. हा भव्य सोहळा दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी पुणे येथे पार पडणार आहे. डॉ. शंकर पाटील यांच्या या गगनभरारीबद्दल अतिग्रे गावासह संपूर्ण हातकणंगले आणि कोल्हापूर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे!
Views: 14



























