माझ्या पाखराच्या मृत्यूचे सत्य समोर आणा!” १३ वर्षांच्या प्रज्वलच्या आत्महत्येमागे फॉरेन्सिक तपासणीची मागणी; गृहमंत्र्यांकडे तक्रार


“माझ्या पाखराच्या मृत्यूचे सत्य समोर आणा!” १३ वर्षांच्या प्रज्वलच्या आत्महत्येमागे फॉरेन्सिक तपासणीची मागणी; गृहमंत्र्यांकडे तक्रार

सुनील पाटील : रिस/खालापूर:

एक अवघ्या १३ वर्षांचा उमलता कळीसारखा जीव… ज्या वयात हातामध्ये खेळणी, अभ्यासाची पुस्तके आणि डोळ्यांत भविष्याची अथांग स्वप्ने असायची, त्या वयात अचानक असा कोणता अंधार दाटून आला की, त्या कोवळ्या जिवाला मृत्यूच्या दारात जावे लागले?

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा गावचे मूळ रहिवासी आणि सध्या खालापूरमधील रिस (मोहापाडा) येथील महालक्ष्मी रुबी सोसायटीत राहणारे रणजीत परशुराम पाटील यांचा अल्पवयीन मुलगा प्रज्वल (वय १३) याच्या आत्महत्येने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. २३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रज्वलने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला. तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचाराची पराकाष्ठा करण्यात आली, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एका निष्पाप बालकाचा असा दुर्दैवी अंत केवळ एका कुटुंबाचा नाही, तर माणुसकीला वेदना देणारा ठरला आहे. पण हा केवळ एक अपघात की त्या कोवळ्या मनावर टाकलेला असह्य ताण? आज एका हतबल, दुःखी बापाचे काळीज आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी टाहो फोडत आहे. रणजीत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिशय आर्त मागणी केली आहे— *”माझ्या पाखराच्या मृत्यूचे सत्य समोर आणा, निष्पक्ष आणि वैज्ञानिक तपास करा!”*

**डिजिटल पुराव्यांमध्ये दडलंय रहस्य?**

रणजीत पाटील यांनी आपल्या तक्रारीत मुलाच्या मोबाईलमधील इन्स्टाग्राम संभाषणे (Instagram Chats), गुगल सर्च हिस्ट्री (Google Search History), कॉल तपशील आणि इतर डिजिटल पुराव्यांची सखोल व फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीत नमूद केलेले गंभीर मुद्दे:

* **अश्लील व्हिडिओचा संशय:** प्रज्वल तसेच परिसरातील काही अल्पवयीन मुला-मुलींमधील इन्स्टाग्राम संभाषणांची चौकशी व्हावी. एका व्यक्तीकडून अन्य एका मुलीशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओ प्रज्वलकडे पाठवण्यात आल्याची माहिती असून, या बाबीचा त्याच्या मानसिक स्थितीशी काय संबंध होता, याची चौकशी व्हावी.

* **डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याची मागणी:** प्रकरणातील काही इन्स्टाग्राम चॅट्स आणि हिस्ट्री डिलीट करण्यात आल्याची शक्यता आहे. संबंधित डिजिटल पुरावे सुरक्षित करून कायदेशीर व तांत्रिक प्रक्रियेनुसार Deleted Chats आणि History ‘Recover’ करून तपासावी.

* **महागडे गिफ्ट्स आणि वाद:** एका मुलाकडून प्रज्वलला महागडे गिफ्ट व परफ्यूम दिले जात असल्याचा, तसेच घटनेपूर्वी अन्य एका व्यक्तीसोबत प्रज्वलचा वाद झाल्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे.

**पोलीस तपासावर असंतोष**

या प्रकरणी २३ ऑगस्ट रोजी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२६ रोजी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे लेखी व ई-मेलद्वारे पुन्हा विनंती करण्यात आली. मात्र, अद्याप अपेक्षित स्वरूपाचा वैज्ञानिक व डिजिटल पुराव्यांवर आधारित तपास होत नसल्याची खंत एका दुःखी पित्याने व्यक्त केली आहे.

मृत प्रज्वल अल्पवयीन असल्याने त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामागे मानसिक दबाव, धमकी, कथित ब्लॅकमेलिंग की प्रवृत्त करण्याचा प्रकार होता? हे सत्य समोर येणे गरजेचे आहे. या निवेदनाच्या प्रती रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला पाठवण्यात आल्या आहेत.

आता तरी पोलीस प्रशासन या आक्रोशाची दखल घेऊन फॉरेन्सिक तपासाच्या आधारे सत्याचा शोध घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!