कोंढव्यात भव्य नशामुक्ती जनजागृती रॅली; नगरसेवक गफुर पठाण यांच्या पुढाकाराने पेटली जनजागृतीची मशाल
काळोखाच्या वाटेवर चुकून पाऊल पडावं आणि कुणीतरी मायेने हात धरून पुन्हा प्रकाशात आणावं, तसंच काहीसं आज कोंढव्यात घडलं.


आपलीच कोवळी पोरं नशेच्या जाळ्यात अडकत असताना पाहून उभा कोंढवा अस्वस्थ झाला होता. पोलीस प्रशासनाने जेव्हा या नशेच्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढला, तेव्हा तो फक्त एका कायद्याचा भाग नव्हता; तर कित्येक आयांच्या काळजाला मिळालेला तो एक दिलासा होता. याच धडाकेबाज कारवाईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी प्रभाग क्र. १९ चे नगरसेवक ॲड. हाजी गफुर पठाण यांच्या पुढाकारातून एक भव्य नशामुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीत केवळ माणसं चालत नव्हती, तर एक अखंड गाव आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी धावून आलं होतं. हातातील पाट्या आणि डोळ्यांत आपल्या मुलांच्या सुरक्षेची चिंता घेऊन शाळेची लहानगी मुले, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक, मौलवी, उलेमा आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या प्रवासात सहभागी झाले होते.
“आमची पोरं चुकीच्या वाटेवर जात असताना त्यांना सावरणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. कोंढवा पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी नशेविरोधात जे धाडसी पाऊल उचललं आहे, त्याला संपूर्ण कोंढवावासीयांचा पूर्ण पाठिंबा आहे. यापुढेही होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कारवाईत आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू,” असा निर्धार यावेळी नगरसेवक गफुर पठाण यांनी व्यक्त केला.
नशामुक्त सकाळ अनुभवण्यासाठी आणि आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल पाहण्यासाठी आज कोंढव्यातील प्रत्येक मन एकवटलं होतं. ही रॅली म्हणजे केवळ एक मोर्चा नव्हता, तर आपल्या स्वतःच्या घराला आणि पोरांना वाचवण्यासाठी उठलेली एक मायेची हाक होती.































