पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील काही प्रभागांच्या फेर निवडणुका घ्याव्यात…


पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील काही प्रभागांच्या फेर निवडणुका घ्याव्यात..

पुण्यातील एक नागरिक डॉ. तुषार निकाळजे यांनी पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या काही प्रभागांतील निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात व नियम भंग करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी याबाबत निवडणूक आयोगास डिसेंबर 2025 पासून पुढील पत्र व्यवहार र केला आहे व याबाबत विनंती केली आहे . निवडणूक आयोगास पाठवलेला पत्रामध्ये पुढील बाबी निदर्शनास आणल्या आहेत.

विषय : जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (महाराष्ट्र राज्य) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पुनर्निवडणूक / पुनर्मतदान घेण्याबाबत विनंती.

संदर्भ : निवडणूक आयोगाच्या “ON ELECTION DUTY” असे चिन्हांकित चारचाकी वाहनांचा निवडणूक अधिकाऱ्यांकडून वापर करताना त्या वाहनांवर धार्मिक प्रवचनकारांची छायाचित्रे, धार्मिक प्रतीके, सांकेतिक स्टिकर्स, मूर्ती, धार्मिक शब्द, राजकीय पक्ष किंवा उमेदवारांशी संबंधित रंग, झेंडे इत्यादींचे प्रदर्शन करून विशिष्ट धर्म, जात, राजकीय पक्ष किंवा उमेदवाराचा प्रचार होत असल्याबाबत.

महोदय,

पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (महाराष्ट्र राज्य) यांच्या निवडणुका दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडल्या. या निवडणुकांदरम्यान माझ्या निदर्शनास आलेल्या पुढील बाबी आपल्या कृपादृष्टीस आणून देत असून, त्यासंदर्भातील उपलब्ध पुरावेही सादर करीत आहे.

भारत हा एक यशस्वी लोकशाही देश असून निवडणूक आयोग निष्पक्षपणे कार्य करतो, अशी जनतेची अपेक्षा आहे. तथापि, दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या निवडणूक कालावधीत काही गंभीर व आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्या. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकाऱ्यांकडून वापरण्यात येणाऱ्या निवडणूक आयोगाच्या वाहनांवर “ON ELECTION DUTY” असे फलक किंवा स्टिकर्स लावलेले होते. मात्र, त्या वाहनांच्या पुढील काचांवर, बाजूच्या काचांवर, बोनटवर विविध धर्म, जात किंवा धार्मिक प्रवचनकारांशी संबंधित प्रतीके, शब्द, छायाचित्रे व स्टिकर्स लावलेले होते. अनेक वाहनांच्या डॅशबोर्डवर विविध देव-देवतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. काही वाहनांवर धार्मिक प्रवचनकारांची छायाचित्रे लावण्यात आली होती. तसेच राजकीय पक्ष, उमेदवार, जात किंवा धर्माशी संबंधित रंगांचे झेंडे किंवा चिन्हे वाहनांवर लावलेली आढळली. ही चारचाकी वाहने संपूर्ण शहरात निवडणूक व प्रशासकीय कामासाठी फिरत असल्याने या बाबीची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून “ON ELECTION DUTY” फलकासह इतर आक्षेपार्ह स्टिकर्स, मूर्ती, छायाचित्रे, सांकेतिक चिन्हे व शब्द याबाबत योग्य ती कारवाई करावी. अशा प्रकारची अनेक वाहने विविध प्रभागांमध्ये कार्यरत होती. निवडणूक साहित्य वाहून नेणाऱ्या एका खासगी वाहनावर धार्मिक प्रवचनकाराचे छायाचित्र आणि त्याच्या शेजारी एका राजकीय पक्षाचा स्टिकर लावलेला होता. तसेच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर व घोले रोड प्रादेशिक कार्यालय परिसरात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दोन माजी मंत्री यांच्या वृत्तपत्रातील छायाचित्रांचे प्रदर्शन निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण केंद्राजवळ केले होते. निवडणूक आयोग अशा प्रकारे व्यक्ती, उमेदवार किंवा राजकीय पक्षांचा प्रचार करतो का? त्यामुळे पुढील प्रश्नांची चौकशी होणे आवश्यक आहे :

1. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.

2. निवडणूक प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.

3. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण व मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.

4. मायक्रो-ऑब्झर्व्हर्स यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती का?

5. ही बाब प्रशासकीय पदाचा गैरवापर मानली जाऊ शकते काय?

6. निवडणूक आयोगाच्या वाहनांवर अशी छायाचित्रे, स्टिकर्स, मूर्ती, सांकेतिक चिन्हे व शब्द लावणे हे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी विशिष्ट राजकीय पक्ष, उमेदवार, जात किंवा धर्माशी संबंधित दृश्य प्रचार (Visual Campaigning) मानले जाऊ शकते का?

7. आजपर्यंत या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांचे मनमानी स्वरूपाचे कार्य दिसून येते का? तसेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशांचे सदस्यत्व नसल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कोणतीही जबाबदारी किंवा सक्ती राहत नाही काय? या बाबीचीही पडताळणी करण्यात यावी.

संलग्न छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या वाहनांपुरतीच कारवाई न करता, इतर प्रभागांतील अशाच वाहनांचा शोध निवडणूक प्रशिक्षण केंद्रांजवळील सीसीटीव्ही फुटेज, कार्यालयीन पार्किंग परिसर, तसेच निवडणूक कामावर असलेल्या वाहनांच्या नोंदी तपासून घेण्यात यावा आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

वरील सर्व बाबींचा विचार करता असे दिसून येते की निवडणूक आयोगाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर काही अधिकारी व कर्मचारी धार्मिक, जातीय किंवा राजकीय संदेश देणारे स्टिकर्स, चिन्हे, मूर्ती, शब्द व रंग वापरत होते. ही बाब निवडणूक आयोगाकडूनच अप्रत्यक्ष प्रचार केल्यासारखी मानली जाऊ शकते. अशा कृतीमुळे विशिष्ट उमेदवार किंवा राजकीय पक्षाला लाभ झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची निष्पक्ष प्रतिमा व जनतेचा विश्वास यांना धक्का पोहोचू शकतो.

अशा घटनांचा परिणाम भारताच्या आशियाई निवडणूक महासंघाच्या (Asian Election Federation) अध्यक्षपदावरील प्रतिमा तसेच भविष्यातील आंतरराष्ट्रीय निवडणूक महासंघातील भूमिकेवरही होऊ शकतो. (दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी स्वीडन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताला अध्यक्षपद प्रदान करण्यात आले.)

ही सर्व बाब पुणे महानगरपालिका निवडणूक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक आयुक्त, उपआयुक्त, आदर्श आचारसंहिता विभाग, निवडणूक प्रशासन विभाग, भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) व आचारसंहिता विभाग यांना ई-मेल व माहिती अधिकार अर्जाद्वारे कळविण्यात आली आहे.

या प्रकरणाची पुढील कायदेशीर तरतुदींशी तुलना व पडताळणी करण्यात यावी :

1. भारतीय संविधान – अनुच्छेद ३२४, ३०९, १४ व १५.

2. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ व आदर्श आचारसंहिता.

3. भारतीय दंड संहिता (IPC) मधील लागू होणारी कलमे (उदा. कलम ४२० व इतर संबंधित कलमे).

4. नागरी सेवा नियम (Civil Services Rules).

म्हणून आपणास विनम्र विनंती आहे की, वरील सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या जानेवारी २०२६ मधील निवडणुका पुनर्निवडणूक (Re-Election) किंवा पुनर्मतदान (Re-Poll) घेऊन नव्याने पार पाडण्यात याव्यात. धन्यवाद.

डिसेंबर 2025 पासून या प्रकरणाबाबत पाठपुरावा चालू आहे, परंतु निवडणूक आयोगाकडून कोणतीही कार्यवाही किंवा कारवाई करण्यात आलेली नाही.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!