काय ती टेक्नॉलॉजी, काय ती घरं… जपाननं तर प्रत्यक्ष पाताळालाच धाक दाखवला !
सुनील पाटील :
जपानने जे करून दाखवलंय, ते पाहून काळजाचा ठोका चुकला नाही तर नवल! अहो, तिकडे जमीन थुईथुई नाचायला लागली की लोकांची घरं जमिनीला सोडून चक्क हवेत ‘फ्लाईट’ घेतात! ही कसली टेक्नॉलॉजी? जणू काय जपानच्या इंजिनिअर्सनी प्रत्यक्ष यमराजालाच ठेंगा दाखवून सांगितलंय – “बापा, तू कितीही आपट, आमची घरं आता तुझ्या हाती लागणार नाहीत!” जमिनीखालील एअर बॅग्स अशा फुगतात की घर ३ सेंटीमीटर वर तरंगायला लागतं. म्हणजे खाली पाताळात तांडव सुरू असताना वरच्या मजल्यावर शांतपणे सुशी खात बसता येणार!
पण इकडे आपल्याकडे काय? आमच्याकडे अजूनही ५९ टक्के जमिनीखाली ‘भूकंप’ दबा धरून बसलाय, पण आमची चर्चा अजूनही जुन्याच सिमेंटच्या गोण्यांवर अडकलीय. जपान जर मृत्यूला हवेत उडवू शकतो, तर आम्ही अजून ढिगाऱ्याखाली गाडल्या जाण्याची वाट का पाहत आहोत?
युद्धाचा वणवा आणि मध्यमवर्गीयाचा ‘होम’हवन!
पण खरी मेख पुढेच आहे. तिकडे अमेरिका, इराण, इस्रायल एकमेकांचे मुडदे पाडायला टपलेत आणि १८-१८ दिवस चालणाऱ्या या युद्धामुळे इकडे माझ्या पुण्यातल्या आणि मुंबईतल्या ‘सोसायटी’ धारकांचा जीव टांगणीला लागलाय. का? तर गॅसचा तुटवडा!
श्रीमंतांना काय, ते पाच-दहा हजाराचं बिल भरून ‘इलेक्ट्रिक शेगडी’वर स्वयंपाक करतील. पण जो माणूस चाळीतून नुकताच फ्लॅटमध्ये गेलाय, जो हप्त्यांच्या डोंगराखाली दबलाय, त्याने काय करायचं? गॅस संपला की त्याने काय बाल्कनीत बसून लाकडं पेटवायची का? का शेजाऱ्याच्या तोंडचा धूर बघून पोट भरायचं?
बिल्डर आणि सरकार, आता तरी डोळे उघडा!
आम्ही सांगतो, यापुढे इमारतींचे आराखडे काढताना फक्त ‘पार्किंग’ आणि ‘लॅण्डस्केपिंग’ बघून चालणार नाही. उद्या जर गॅसचा दुष्काळ पडला, तर त्या ३०-४० मजली इमारतीतला माणूस अन्न कशावर शिजवणार, याचा विचार बिल्डर असोसिएशनने आत्ताच करायला हवा. फ्लॅटमध्ये कोळशाच्या किंवा लाकडाच्या शेगड्यांसाठी खास ‘डक्ट’ (धूर बाहेर जाण्याचे मार्ग) का काढले जात नाहीत?
सरकारनेही ‘गोबर गॅस’च्या पाईपलाईनवर लक्ष द्यायला हवं. कचऱ्यातून ऊर्जेची निर्मिती ही केवळ भाषणापुरती नको, ती थेट किचनपर्यंत पोहोचायला हवी. जपानने स्वतःला वाचवण्यासाठी हवेत उडायची ताकद कमावली, आपण किमान आपलं पोट जाळण्यासाठी जमिनीवरची सोय तरी भक्कम करूया!
लक्षात ठेवा, भूकंप माणसाला एकदा मारतो, पण उपासमार त्याला रोज मारते. जपानचं हे ‘उडणारं घर’ पाहून आम्ही थक्क झालोय खरं, पण आता आमच्या रिकाम्या ‘गॅस सिलेंडर’ कडे पाहून रडू येतंय!



























