नाशिकच्या नराधमामुळे महिला आयोगाच्या दरबारात पडझड ; चाकणकरांचे पद गेले !
मुंबई: कळस झाला आणि अखेर तो भोंदूगिरीचा डोलारा कोसळला! नाशिकच्या त्या लंपट अशोक खरातने धर्माच्या नावाखाली जे पाशवी कृत्य केले, त्याचे विखारी लोण आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे. ज्यांच्याकडे महाराष्ट्रातील माता-भगिनी न्यायासाठी आशेने पाहत होत्या, त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आज या भोंदूच्या ‘सावलीमुळे’ आपल्या सन्मानाचा आणि पदाचा त्याग करावा लागला.
पाप खरातचे, ताप चाकणकरांना!
एका बाजूला त्या नराधमाचे १०० हून अधिक संतापजनक व्हिडिओ आणि दुसरीकडे सत्तेच्या वर्तुळातील त्याचे वावरणे! समाजमाध्यमांवर या फोटोंनी राळ उडवून दिल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दरबारातून राजीनाम्याचे फर्मान सुटले. “पक्षात राहायचे असेल तर पदाचा मोह सोडावा लागेल,” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुनावल्यवर चाकणकरांना आपली लेखणी चालवावी लागली. महिला आयोगापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा ‘गुलाल’ही पुसला जाणार, हे आता निश्चित झाले आहे.
लॅपटॉपमधील त्या ‘काळ्या’ रात्री!
गुंगीची औषधे देऊन अबलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या खरातने केवळ महिलांचाच विश्वासघात केला नाही, तर त्याने राजकीय नेत्यांच्या प्रतिमेलाही सुरुंग लावला आहे. पोलिसांच्या हाती लागलेले दोन लॅपटॉप हे केवळ पुरावे नसून ते या आधुनिक युगातील ‘भस्मासुरा’चे कच्चे चिट्ठे आहेत. ज्यांच्या सहवासात वावरल्याने आज चाकणकरांना हा ‘राजकीय वनवास’ भोगावा लागत आहे, त्या खरातच्या पापात आणखी किती जणांचे हात माखलेले आहेत, याचे उत्तर आता काळाच्या उदरात दडलेले आहे.
“राजकारणात एकदा का चारित्र्यावर शिंतोडा उडाला की, गंगेत न्हाऊनही तो धुतला जात नाही,” अशा शब्दांत आज मुंबईच्या राजकीय गोटात या घटनेची चर्चा रंगली आहे.



























