महाराष्ट्राचे आमिर-ए-दावत-ए-तबलीग हाफिज मंजूर साहेब यांचे निधन ; हजारोंच्या उपस्थितीत निगडी कब्रस्तान मध्ये दफन विधी संपन्न


मुस्लिम समाजात शोककळा; आयुष्यभर दीनी खिदमत आणि उम्मतच्या मार्गदर्शनासाठी वाहिले जीवन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी चिंचवड, दि. १८ मे २०२६ : महाराष्ट्राचे आमिर-ए-दावत-ए-तबलीग हाफिज मंजूर साहेब यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण मुस्लिम समाजात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण मुस्लिम समाज, दीनी व तबलीगी क्षेत्रांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हाफिज मंजूर साहेब यांनी पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड मधील निगडी येथे असलेल्या मस्जिद-ए-फातिमा येथे आपले संपूर्ण आयुष्य दीन-ए-इस्लामची सेवा, लोकांना दीनी शिक्षण देणे आणि उम्मतचे मार्गदर्शन करण्यात व्यतीत केले. त्यांच्या साधेपणा, उत्तम आचरण, धार्मिक ज्ञान आणि दावत-ए-दीनच्या कार्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात आदराने ओळखले जात होते.

माहितीनुसार, त्यांनी हजारो लोकांना दीनच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या तकरीरी आणि नसीहतांचा लोकांच्या मनावर खोल प्रभाव पडत असे. त्यांच्या निधनाला मुस्लिम समाज मोठी हानी मानत आहे.

दरम्यान, मरहूम हाफिज मंजूर साहेब यांचा दफन विधी निगडी येथील कब्रस्तानमध्ये हजारोंच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.

दफन विधीसाठी राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, उलेमा, सामाजिक कार्यकर्ते आणि तबलीगी जमातशी संबंधित नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण पाहायला मिळाले.

हाफिज मंजूर साहेब यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर विविध सामाजिक, धार्मिक आणि तबलीगी संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्यासाठी दुआ-ए-मगफिरत करत आहेत.

मरहूम हाफिज मंजूर साहेब यांच्यासाठी दुआ करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अल्लाह तआला त्यांच्या चुका माफ करो, त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये सर्वोच्च स्थान प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना सब्र-ए-जमील अता करो, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!