इचलकरंजीच्या सांस्कृतिक वैभवाला ठेकेदाराचे ‘ग्रहण’! संथ कामाची चौकशी करून मक्तेदाराला घरी पाठवण्याची उमाकांत दाभोळेंची आग्रही मागणी!


मुदतवाढ किंवा दरवाढ देण्याचा ‘नाटकी’ प्रयत्न केल्यास थेट न्यायालयाची पायरी चढण्याचा कडक इशारा

इचलकरंजी शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या ‘ना.बा. घोरपडे नाट्यगृहा’चे सध्या नूतनीकरण सुरू आहे की केवळ ‘मूर्तीभंजन’, असा जळजळीत सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत! या नाट्यगृहाच्या कामात झालेल्या अक्षम्य विलंबाचा खरपूस समाचार घेत, संबंधित मक्तेदारावर (ठेकेदारावर) कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जागरूक सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांनी महापौर, आयुक्त आणि उपमहापौर यांच्या हातात थेट निवेदन देऊन प्रशासनाचे डोळे उघडण्याचे काम केले आहे.

६ महिन्यांची मुदत, पण कामाचा वेग मात्र कासवाचा !

या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित मक्तेदाराला मोठ्या थाटामाटात कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला होता. सहा महिन्यांत काम पूर्ण करून जनतेला सुपूर्द करण्याची अट करारात अगदी अक्षराक्षरांत लिहिली होती. पण आज प्रत्यक्ष कामाची पाहणी केली, तेव्हा असं दिसलं की काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की, त्यापेक्षा आमच्या घरातील मुंग्या जास्त वेगाने चालतील! मुदत संपत आली तरी काम अजून ‘पडद्यामागेच’ रेंगाळत असल्याने दाभोळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पालिकेचे नुकसान करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ ‘ब्लॅकलिस्ट’ करा !

नाट्यगृहाच्या कामासाठी शासनाने तिजोरी खुली करून भरघोस निधी मंजूर केला होता. असे असतानाही काम वेळेत पूर्ण न होणे ही अत्यंत गंभीर आणि हास्यास्पद बाब आहे. ठेकेदाराच्या या ‘थिल्लर’ कारभारामुळे महानगरपालिकेच्या आर्थिक हिताचे पार वाटोळे झाले असल्याचा थेट आरोप दाभोळे यांनी केला आहे.

दाभोळे यांनी निवेदनातून प्रशासनाला सुनावलेले कडक बोल 

नो मुदतवाढ: संबंधित मक्तेदाराला एका दिवसाचीही मुदतवाढ मिळता कामा नये.

दरवाढ तर स्वप्नातही नाही: कामाचा खर्च वाढवून देण्याचा किंवा कोणताही अतिरिक्त आर्थिक लाभ देण्याचा पाचर मारू नका.

काळ्या यादीत टाका: कराराचा भंग केल्याबद्दल या महाशयांना तात्काळ ‘ब्लॅकलिस्ट’ करून घरी बसवा.

नुकसान भरपाई घ्या : विलंबा मुळे पालिकेचे जे काही नुकसान झाले आहे, ते या ठेकेदाराच्या खिशातून वसूल करा आणि कामाची तांत्रिक तपासणी करून अहवाल जनतेसमोर ठेवा.

…अन्यथा कोर्टात नवीन ‘नाटक’ सुरू करू !

“भविष्यात अशा प्रकारे सरकारी कामे रखडू नयेत म्हणून फक्त ठेकेदारालाच नाही, तर त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी झालीच पाहिजे,” अशी आग्रही मागणी दाभोळे यांनी केली आहे.

शेवटी प्रशासनाला अत्रेंच्या शैलीत कडक इशारा देताना उमाकांत दाभोळे म्हणाले की, जर पालिकेच्या कारभाऱ्यांनी नियम आणि अटी धाब्यावर बसवून, या लाडक्या मक्तेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याला मुदतवाढ व दरवाढ देऊन त्याचे खिसे भरण्याचे पाप केले, तर आम्ही शांत बसणार नाही. जनहितासाठी आम्ही थेट न्यायालयीन दाद मागू आणि तिथे प्रशासनाचे ‘महानाट्य’ उभे करू!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!