
पेठ वडगाव येथील बी.एड. महाविद्यालयात पालक सभा व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न
पेठ वडगाव : येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव महाविद्यालयामध्ये नुकतीच पालक सभा आणि पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. एल. चौगुले-निर्मळे उपस्थित होत्या. प्रारंभी आलेल्या सर्व मान्यवर पालकांचे चहापानाने स्वागत करण्यात आले. प्रा. एस. के. सोरटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे पालकांकडून कौतुक
पालक सभेदरम्यान उपस्थित पालकांनी महाविद्यालयाचे प्रशासन, नियोजनबद्ध व्यवस्था, दर्जेदार अध्ययन-अध्यापन आणि विद्यार्थ्यांमधील शिस्त याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या महाविद्यालयाच्या प्रगतीचे आणि शिस्तबद्ध वातावरणाचे पालकांनी भरभरून कौतुक केले.
हितगुज आणि मार्गदर्शन
अध्यक्षीय भाषणात डॉ. निर्मळे मॅडम यांनी पालकांशी संवाद साधला. महाविद्यालयाकडून पालकांच्या काही विशेष अपेक्षा असल्यास त्या मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि महाविद्यालय यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
पाककला स्पर्धेत ‘उन्हाळी पौष्टिक’ पदार्थांची मेजवानी
पालक सभेनंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पाककृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. याचे उद्घाटन प्राचार्या डॉ. आर. एल. चौगुले-निर्मळे यांच्या हस्ते झाले. विशेषतः उन्हाळ्यासाठी पोषक आणि आरोग्यदायी अशा विविध पदार्थांची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली होती. सर्व उपस्थितांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला. सहभागी विद्यार्थ्यांचे यावेळी विशेष अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. पी. सावंत यांनी केले, तर प्रा. व्हि. डी. चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल एस. एस. चौगुले, सर्व प्राध्यापक वृंद आणि प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.




























