मोठी बातमी! राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कृष्ण प्रकाश, तेजस्वी सातपुते यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी


मोठी बातमी! राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कृष्ण प्रकाश, तेजस्वी सातपुते यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

सुनील पाटील

मुंबई : राज्यातील पोलीस खात्यात आज मोठे फेरबदल पहायला मिळाले आहेत. गृह विभागाकडून अनेक बड्या आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या फेरबदलात मुंबई आणि पुण्यासह अनेक जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलीस पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सहपोलीस आयुक्तपदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनोजकुमार शर्मा मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत. अनिल कुंभारे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदी, तर सुवेझ हक यांची मुंबई पोलिसांच्या प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईच्या वाहतूक सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदी राजेश प्रधान हे नवीन पदभार स्वीकारणार आहेत.

याच फेरबदलात वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांची प्रशिक्षण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच लखमी गौतम यांची कायदा व सुव्यस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, तर परमजित दहिया यांची एटीएसच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे आणि कोल्हापूर परिक्षेत्रातही महत्त्वाचे बदल झाले आहेत. संजय दराडे हे पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत, तर पुण्याचे विद्यमान सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महिला अधिकारी तेजस्वी सातपुते यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चर्चित खरात प्रकरणातील एसआयटीचा तपास सातपुते यांच्याकडेच कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये दत्तात्रय कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे, तर प्रवीण पडवळ हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार सांभाळतील. मुंबईतील डीसीपी प्रवीण मुंढे, कृष्कांत उपाध्याय आणि दीक्षित गेडाम यांना पदोन्नती देण्यात आली असून, हे तिन्ही अधिकारी मुंबईतच अप्पर पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.

इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये मोक्षदा पाटील यांची अप्पर पोलीस आयुक्त मुंबई येथे, तर योगेश गुप्ता यांची गडचिरोलीच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. महेश्वर रेड्डी सीआयडीच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी, राकेश ओला अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त, सी. के. मीना कोकण परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि निशीथ मिश्रा यांची विशेष आयजी प्रशिक्षण येथे बदली करण्यात आली आहे. राज्यातील या मोठ्या प्रशासकीय फेरबदलांमुळे पोलीस दलाला नवीन गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!