मंत्रालयात माणुसकी मेली की अधिकारी ? ‘दादां’च्या निधनानंतर सही चोरून ७५ शाळांचे उखळ पांढरे!
अजितदादांच्या सरणाची आग विझण्यापूर्वीच ‘डिजिटल अंगठ्या’चा मलिदा; पँथर आर्मीचा मंत्रालयाला घेराव घालण्याचा सज्जड इशारा!
मुंबई | महाराष्ट्राच्या मातीला संतांची आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे, पण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेल्या काही नरराक्षसांनी या परंपरेचे धिंडवडे काढले आहेत! राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा देह पंचत्वात विलीन होत असताना, संपूर्ण महाराष्ट्र अश्रू ढाळत असताना आणि शासकीय सुट्टीचे पडघम वाजत असताना, मंत्रालयातील काही ‘डिजिटल चोरट्यांनी’ चक्क मृत नेत्याच्या सहीचा व्यापार मांडला आहे. ७५ शिक्षण संस्थांना ‘अल्पसंख्याक’ दर्जाची खिरापत वाटून कोट्यवधींचा मलिदा लाटल्याचा खळबळजनक आरोप पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले यांनी केला आहे.

मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आधुनिक वेताळ..!
२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:४६ ला दादांचे निधन झाले. दुपारी ३:०९ वाजता जेव्हा अख्खा महाराष्ट्र शोकाकुल होता, तेव्हा मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागात ‘फाईलींचा पाऊस’ पडत होता. ज्या मंत्र्याचा श्वास थांबला, त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने अवघ्या काही तासांत ७५ शाळांना ‘अल्पसंख्याक’ दर्जा बहाल केला. हा प्रकार म्हणजे प्रशासकीय गलिच्छपणाचा कळस असून, मृत व्यक्तीच्या आत्म्याचा केलेला अपमान आहे. या “डिजिटल दरोड्यामागे” नेमका कोणाचा हात आहे?
गरिबांच्या पोरांचा गळा घोटला..!
पोदार इंटरनॅशनलच्या २५ शाळा आणि सेंट झेवियर्स सारख्या बड्या ‘शिक्षणसम्राटांना’ हा दर्जा का दिला? तर गरिबांच्या, दलितांच्या आणि वंचितांच्या पोरांना मिळणारे RTE अंतर्गत २५% आरक्षण संपावे म्हणून! एका प्रमाणपत्रासाठी २५ लाखांची बोली लावणाऱ्या या अधिकाऱ्यांनी केवळ भ्रष्टाचार केला नाही, तर गरिबांच्या मुलांच्या भविष्याची होळी केली आहे. मंत्रालयातील कोणत्या सचिवाने हा ‘ओव्हरटाईम’ केला, याची उत्तरं आता द्यावीच लागतील!
पँथर आर्मीचा ‘आठ दिवसांचा’ अल्टिमेटम:
संतोष आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेल पाठवून या प्रकरणाची CID चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा:
दोषी सचिवांचे तात्काळ निलंबन करा !
७५ संस्थांचा बोगस ‘अल्पसंख्याक’ दर्जा रद्द करा ! डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा!
“जर ७ दिवसांत या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली नाही, तर पँथर आर्मी मंत्रालयाचे दरवाजे तोडून आत शिरेल. हा लढा शिक्षणाच्या लुटीविरुद्ध आणि दादांच्या अस्मितेसाठी आहे!” > — संतोष एस. आठवले (प्रमुख, पँथर आर्मी)































