महापालिकेचा ‘दिव्यांग’ कारभार; ई-वाहने धूळ खात, प्रशासन मात्र सुस्त


अरे, खुर्चीवर बसलेल्या लेचापेचांनो, त्या दिव्यांगांच्या शापाची तरी भीती बाळगा..!

पुणे/पिंपरी : विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अजब आणि गजब कारभाराचे वाभाडे काढावेत तितके थोडेच आहेत! गरिबांच्या, दिव्यांगांच्या हक्कावर डल्ला मारणे किंवा त्यांच्या नशिबी फक्त आश्वासनांची गाजरे ठेवणे, हा जणू इथल्या प्रशासनाचा ‘नित्यक्रम’च झाला आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून दिव्यांगांसाठी ई-वाहने खरेदी केली खरी, पण ती वाटण्याऐवजी ‘दिव्यांग भवनाच्या’ पार्किंगमध्ये सडत टाकली आहेत. या भीषण आणि संतापजनक प्रकारावर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी कडाडून हल्ला चढवला असून, “जर ही वाहने तातडीने दिली नाहीत, तर गाठ मनसे स्टाईल आंदोलनाशी आहे,” असा खणखणीत इशारा दिला आहे.

प्रशासनाची ही कसली ‘मेहेरबानी’? ज्या दिव्यांग बांधवांना या वाहनांच्या आधारे स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते, रोजगारासाठी धावायचे होते, त्यांच्या पदरी प्रशासनाने केवळ धूळ टाकली आहे. आरटीओच्या नावाखाली ‘बागुलबुवा’ उभा करून सामान्य दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसण्याचे हे नीच कृत्य सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही वाहने उन्हातान्हात उभी असून त्यांचे टायर पंक्चर झाले आहेत, आसनव्यवस्था खराब होत आहे. म्हणजे, जनतेचा पैसा असा पाण्यात घालताना या प्रशासनाच्या हाताला कंप सुटत नाही, हेच आमचे दुर्दैव!

चिखले यांचा कडाडता सवाल “वाहने खरेदी केलीत तर ती वाटायला काय तुमचे मरण ओढवले आहे?” असा जळजळीत प्रश्न सचिन चिखले यांनी उपस्थित केला आहे. केवळ गाजावाजा करून प्रसिद्धीच्या झोतात यायचे आणि काम करण्याच्या वेळी हात वर करायचे, ही महापालिकेची वृत्ती आता मनसे सहन करणार नाही. प्रशासनाच्या या निष्क्रियतेचे आणि असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण म्हणजे ती धूळ खात पडलेली ई-वाहने!

आता ‘मनसे स्टाईल’च इलाज! महापालिका आयुक्त आणि महापौरांना दिलेल्या निवेदनात चिखले यांनी स्पष्ट सुनावले आहे की, तांत्रिक अडचणींचा पाढा वाचून वेळकाढूपणा करू नका. जर ही वाहने तात्काळ दिव्यांगांच्या हाती पडली नाहीत, तर होणाऱ्या परिणामांना प्रशासनच जबाबदार असेल. मनसेचे आंदोलन कसे असते, हे या सुस्त अधिकाऱ्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही.

यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन त्यांनाही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. या शिष्टमंडळात रुपेश पटेकर, बाळा दानवले, मयूर चिंचवडे यांसारख्या वाघांची फौज उपस्थित होती.

आता पाहायचे हेच की, चिखलेंच्या या इशाऱ्याने प्रशासनाची झोप उडते की ही कुंभकर्णी झोप तशीच सुरू राहते? पण लक्षात ठेवा, दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणाल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही!

 

 


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!