सामान्य माणसाला थेंबभर पाण्यासाठी वणवण, अन् अनधिकृत इमारतींना मात्र सिडकोची ‘अखंड जलधारा’!


सामान्य माणसाला थेंबभर पाण्यासाठी वणवण, अन् अनधिकृत इमारतींना मात्र सिडकोची ‘अखंड जलधारा’!

सुनिल पाटील :

नवी मुंबई : ‘पाणी हेच जीवन’ असे म्हणतात; पण तळोजा परिसरातील काही बिल्डरांनी या सुविचाराचा भलताच ‘व्यावहारिक’ अर्थ लावला आहे! दुसऱ्याच्या जलवाहिनीला दोन इंचाचे भगदाड पाडून आपले ‘जीवन’ समृद्ध करणाऱ्या एका महाभागाचा प्रताप नुकताच उघडकीस आला आहे. तळोजा फेज-१ मधील सेक्टर ७ येथील ‘एल. के. दमयंती रेसीडेन्सी’च्या विकसकांनी चक्क सिडकोच्या मुख्य जलवाहिनीवरच ‘दरोडा’ टाकून, दोन वर्षांत तब्बल २६ दशलक्ष लिटर पाण्याचा फडशा पाडला आहे. सिडकोच्या तिजोरीला यामुळे १७ लाख २२ हजार ३४५ रुपयांचा ‘ओला’ चुना लागला असून, या ‘जलसम्राटां’विरोधात अखेर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

‘एल. के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’चे प्रदीपकुमार पटेल आणि कमलेश पटेल या जोडगोळीने या इमारतीवर परवानगी नसताना काही मजले चढवून आपली ‘आकाशाला गवसणी’ घालण्याची हौस भागवून घेतली. साहजिकच, या ‘अतिउत्साही’ बांधकामामुळे इमारतीला ‘भोगवटा प्रमाणपत्र’ (OC) मिळण्याचा प्रश्नच नव्हता. पण कायद्याला जुमानतील ते कसले बिल्डर! त्यांनी ओसीची वाट न पाहता ५० हून अधिक कुटुंबांना थेट सदनिकांचा ताबा देऊन टाकला. आता माणसे राहायला आली म्हटल्यावर त्यांना पाणी तर लागणारच! अधिकृत नळजोडणी मिळणे अशक्य असल्याने, या कल्पक विकसकांनी इमारतीसमोरील सिडकोच्या मुख्य जलवाहिनीलाच चक्क दोन इंचाचे ‘इंजेक्शन’ टोचले. ना कोणाची परवानगी, ना पाण्याचे मीटर! ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२६ या दोन वर्षांच्या काळात या इमारतीच्या टाक्या सिडकोच्या पाण्याने अखंड तुडुंब भरून वाहत होत्या.

या साऱ्या प्रकारात बिल्डरांची हिंमत तर अफाट आहेच; पण सिडकोच्या अधिकाऱ्यांची ‘समाधी’ त्याहूनही गाढ म्हणायला हवी! दोन वर्षे मुख्य जलवाहिनीतून २६ दशलक्ष लिटर पाणी गायब होत होते, पन्नास कुटुंबे अनधिकृत इमारतीत नांदत होती, तरीही सिडकोच्या देखरेख यंत्रणेच्या ‘दिव्यदृष्टीला’ हा प्रकार दिसला कसा नाही, हा मोठाच संशोधनाचा विषय आहे. दोन वर्षांनंतर सिडकोच्या अभियंत्यांना अचानक ‘दिव्यज्ञान’ झाले आणि त्यांनी शुक्रवारी तळोजा पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

सार्वजनिक संपत्तीवर असा ‘जलयज्ञ’ करणाऱ्या या विकसकांकडून सिडको आता १७ लाखांची वसुली कशी करणार, अनधिकृत मजल्यांवर हातोडा पडणार की नेहमीप्रमाणे केवळ कागदी घोडे नाचवले जाणार, याकडे तळोजावासीयांचे डोळे लागले आहेत. तोपर्यंत, ‘पाणी जपून वापरा’ हा सिडकोचा सल्ला मात्र तळोजाकरांना चांगलाच झोंबल्याशिवाय राहणार नाही!


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!