शिक्षण, जीवन आणि वास्तव: बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रप्पाटा’ 2 जानेवारी रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
इचलकरंजी : शहापूर: ताराबाई गर्ल्स हायस्कूलमधील शिक्षक आणि आता अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण करणारे महमद रफिकमांगुरे सर यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट “रप्पाटा नवीन वर्षात म्हणजेच 2 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. शिक्षणावर आधारित आणि आजच्या जीवनातील वास्तवाला थेट भिडणारा हा चित्रपट विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन येत आहे.
‘फडतरे सर’ म्हणून दिसणार महमदरफिक मांगुरे सर
अभिनेते महमदरफिक मांगुरे सर या चित्रपटात ‘फडतरे सर’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. एका शिक्षकाच्या नजरेतून आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील गुंतागुंत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि पालक-शिक्षक संबंधांवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. ताराबाई गर्ल्स हायस्कूल, शहापूर येथील त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा त्यांना ही भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी नक्कीच झाला असेल.
आजच्या शैक्षणिक विषयावर आधारित
‘रप्पाटा’ हा केवळ एक मनोरंजक चित्रपट नसून, तो आजच्या शिक्षण पद्धतीवर, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि जीवनातील आव्हानांवर भाष्य करतो. शिक्षण, करिअर आणि पालक यांच्या वाढत्या अपेक्षा याभोवतीचे वास्तव या चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळे हा चित्रपट समाजातील प्रत्येक घटकाला विचार करण्यास प्रवृत्त करेल.
सर्वांसाठी ‘पाहण्यासारखा’ चित्रपट
हा चित्रपट विद्यार्थी, पालक आणि शिक्षक (थोडक्यात सर्वांनी) यांनी आवर्जून पहावा, कारण तो मनोरंजन करण्यासोबतच एक सामाजिक जाणीव निर्माण करतो. शिक्षण, संबंध आणि जीवन यावर आधारित हा वास्तववादी सिनेमा आजच्या पिढीला मार्गदर्शन करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
2 जानेवारीपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये “रप्पाटा” प्रदर्शित होत आहे.


























