नवी मुंबईच्या ‘गोल्डमाईन’ इमारतीत देहाचा बाजार ; पोलिसांनी ‘बनावट’ गिऱ्हाईक धाडून फोडला पापाचा अड्डा !
सुनील पाटील :
मुंबईच्या कुशीत वसलेल्या नवी मुंबईतील बेलापूरचा तो चकचकीत परिसर… गगनचुंबी इमारती आणि सुटाबुटात वावरणारी पांढरपेशी माणसं! पण याच झगमगाटाच्या आडोशाला ‘स्पा’च्या नावाखाली काळं कृत्य सुरू होतं. बेलापूरच्या सेक्टर-१५ मधील ‘त्रिशूळ गोल्डमाईन’ इमारतीत, ‘स्पा पॅलेस’ नावाच्या गुहेत शरीराचा बाजार मांडला जात होता. पण म्हणतात ना, ‘पापाचा घडा भरला की तो फुटतोच!’ पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाचा ‘पाश’ टाकला आणि या कुंटणखान्याचा बुरखा टराटरा फाडला!
बनावट गिऱ्हाईक अन् ‘खळ्ळ् खट्याक’ कारवाई..!
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या कानावर जेव्हा या ‘पापकर्माची’ कुणकुण लागली, तेव्हा पोलिसांनी कसलाही उशीर केला नाही. एखाद्या सराईत नटाप्रमाणे पोलिसांनी एक ‘बनावट गिऱ्हाईक’ तयार केला आणि त्याला त्या ‘स्पा’च्या दरबारात पाठवलं. तिथे जाताच ‘सौद्याची’ बोली झाली आणि सिग्नल मिळताच पोलिसांनी छापा टाकला! मंगळवारची ती सांज बेलापूरच्या या ‘पॅलेस’साठी काळरात्र ठरली.
सात जणींची सुटका; चार तर परदेशी सुंदरी..!
या कारवाईत पोलिसांनी ज्यांची सुटका केली, त्या अबलांची अवस्था पाहून कोणाचेही हृदय पिळवटून निघेल. एकूण सात महिलांना या नरकातून बाहेर काढण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, यात केवळ आपल्याकडच्याच नाही, तर चार परदेशी तरुणींचाही समावेश आहे. पैशांचं आमिष दाखवून, गरिबीचा फायदा घेऊन या तरुणींना देहविक्रीच्या दलदलीत ढकललं जात होतं.
‘नितू’चा सुळसुळाट अन् पोलिसांचा पोलिसी इंगा..!
या साऱ्या गोरखधंद्याची सूत्रधार होती नितू हजारिलाल प्रजापत (३३). ही महिला म्हणजे जणू या पापाच्या साम्राज्याची राणीच! तरुण मुलींना पैशांचं गाजर दाखवून त्यांच्याकडून हे घाणेरडं काम करून घेण्याचा विडाच तिने उचलला होता. पण पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिच्याकडून ३ महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
“अहो, याला प्रगती म्हणायचं की अधोगती? इमारतीचं नाव ‘गोल्डमाईन’ म्हणजे सोन्याची खाण, पण कृत्य मात्र कोळशापेक्षाही काळं! ज्या हातांनी कष्ट करायचे, त्या हातांना देहविक्रीच्या बेड्या ठोकणाऱ्या या समाजकंटकांना कडक शासन व्हायलाच हवं. हा तर आधुनिकतेच्या नावाखाली चाललेला नग्न नाच आहे!”
सध्या आरोपीविरुद्ध एनआरआय पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ आणि ‘अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या’नुसार गुन्हा दाखल झाला आहे. बेलापूरच्या या उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या या ‘पॅलेस’च्या कारनाम्यामुळे सुजाण नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



























