‘भीमाच्या वाघिणी’चा मनूवादावर कडाडून हल्ला; महाडमध्ये ऐतिहासिक इफ्तार सोहळा संपन्न!
ज्या महाडच्या भूमीने १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा वणवा अनुभवला, त्याच चवदार तळ्याच्या साक्षीने काल पुन्हा एकदा समतेचा नवा इतिहास लिहिला गेला! “समतेवर आधारित राष्ट्र निर्माण करायचे असेल, तर विखुरलेल्या बहुजन समाजाने आता तरी एकजुटीची वज्रमूठ आवळायला हवी,” अशा शब्दांत ‘भीमाची वाघिणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संविधानप्रेमी माधवी जाधव यांनी प्रतिगामी मानसिकतेच्या चिंधड्या उडवल्या.

निमित्त होते, मुलनिवासी मुस्लिम मंच आणि जमातुल मुस्लिमीन महाड यांच्या वतीने आयोजित ‘स्मृती त्या क्षणाची – त्या रोजा इफ्तारची’ या अभूतपूर्व सोहळ्याचे! महाड सत्याग्रहाच्या स्मृती जागवत, चवदार तळ्याच्या काठावर शेकडो मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या सोबतीने रोजा सोडून सामाजिक सलोख्याचा गुलाल उधळला.
महाजनांना आरसा दाखवणाऱ्या ‘वाघिणी’चा दरारा !
नाशिकच्या सरकारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी बाबासाहेबांचे नाव टाळले तेव्हा ज्यांनी भर सभेत निषेधाचा तुणतुणा वाजवून त्यांना सळो की पळो करून सोडले, त्या माधवी जाधव यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. छत्रपती शिवरायांचे वकील काझी हैदर यांचे १३ वे वंशज काझी मुश्ताक यांना खजूर भरवून माधवी जाधव यांनी जेव्हा रोजा इफ्तार केला, तेव्हा उपस्थित जनसमुदायाने दिलेल्या ‘जय भीम’ आणि ‘अल्लाहु अकबर’च्या घोषणांनी महाडचा आसमंत दुमदुमून गेला!
इतिहासाचे दाखले आणि वर्तमानावर प्रहार. !
आपल्या घणाघाती भाषणात जाधव म्हणाल्या की, “इतिहास साक्षी आहे! ज्या तळ्यावर जनावरांना पाणी पिण्याची मुभा होती, तिथे माणसांना नाकारले जात होते. बाबासाहेबांनी हा अन्याय गाडून माणुसकीचा धर्म शिकवला. आजही काही मनूवादी लोक समाजात विद्वेषाचे विष कालवत आहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावे की मुस्लिम समाजाने प्रत्येक वेळी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. मग तो महाडचा लढा असो, की बाबासाहेबांना संसदेत पाठवणारे बंगालचे बांधव असोत!”
मान्यवरांची उपस्थिती :
या सोहळ्याला पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, मोहम्मद अली चिपळूणकर, हनीफ कातारी यांच्यासह अनेक सामाजिक योद्धे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बंधुभावाचे एक जिवंत आंदोलन उभे राहिले आहे, हेच या गर्दीने सिद्ध केले.
थोडक्यात काय, तर महाडच्या या मातीने काल पुन्हा एकदा ठणकावून सांगितले की, संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन आता पेटून उठला आहे!
अंजुम इनामदार, पुणे
अध्यक्ष: मूलनिवासी मुस्लिम मंच संपर्क: 0928402814




























