नेते रस्त्यावर आंदोलनात, अन् नगरसेवक भाजपच्या सोहळ्यात; बागवेंनी पुराव्यांसह काढले वाभाडे!


नेते रस्त्यावर आंदोलनात, अन् नगरसेवक भाजपच्या सोहळ्यात; बागवेंनी पुराव्यांसह काढले वाभाडे !

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असतानाच, पुणे काँग्रेसमध्ये गटबाजीचा ज्वालामुखी फुटला आहे. काँग्रेस भवन येथे उमेदवारीसाठी मुलाखती सुरू असतानाच माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि रफिक शेख यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. “पक्ष संकटात असताना नेते रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत आणि काही नगरसेवक मात्र भाजप नेत्यांच्या सोहळ्यात मिरवत आहेत,” अशा शब्दांत बागवे यांनी शेख यांच्यावर हल्लाबोल करत त्यांचे वाभाडे काढले.

पुराव्यांच्या फोटोंनी खळबळ

मुलाखतीच्या वेळी अविनाश बागवे यांनी केवळ आरोपच केले नाहीत, तर रफिक शेख यांचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो सर्वांसमोर सादर केले. भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमांना शेख आवर्जून उपस्थित राहतात, असा दावा बागवे यांनी केला. हे फोटो पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

‘गद्दारांना तिकीट नकोच’ – बागवेंचा एल्गार

मुलाखत कक्षातच बागवे यांनी पक्षश्रेष्ठींना ठणकावून सांगितले की, “ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, जे भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत, अशांना पुन्हा उमेदवारी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान करू नका.” यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वातावरण कमालीचे तापले होते.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

एकीकडे पुणे शहर काँग्रेस एकसंघ होऊन भाजपशी लढण्याची भाषा करत असताना, दुसरीकडे उमेदवारीच्या पहिल्याच टप्प्यात हा ‘राडा’ झाल्याने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. या प्रकरणावर आता काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

 

 


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!