पनवेल मध्ये ४४ लाखांचा तांदूळ जप्त


पनवेल मध्ये ४४ लाखांचा तांदूळ जप्त

सुनील पाटील

सार्वजनिक वितरण प्रणालीतील फोर्टीफाईड तांदूळ (पीडीएस) विनापरवानगी खुल्या बाजारात विक्रीस काढल्याप्रकरणी पनवेलच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल ४४ लाखांहून अधिक किमतीचा तांदूळ आणि ७० लाख रूपये किमतीच्या पाच वाहने जप्त केली आहेत.

तीन कंपन्यांच्या माध्यमातून हा तांदूळ गैरमार्गाने बाजारात विक्रीला आणला जात असल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.

पनवेलच्या पुरवठा अधिका-यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी (ता. १) दुपारी दिड वाजता तालुक्यातील कसळखंड येथील आष्टे लॉजिस्टिक्स समोरील ट्रकच्या वाहनतळामध्ये धाव घेतली.

या वाहनतळामध्ये संशयास्पद पाच ट्रक उभे होते. पोलिसांच्या मदतीने या ट्रकमधील मालाची कागदपत्रांची मागणी केली. या तपास मोहीमेमध्ये ट्रकमधील पोत्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी असलेला १६०० क्विंटल फोर्टीफाईड तांदूळ आढळला. २५ किलोग्रॅम वजनाच्या ६,४०० पोत्या तपस पथकाला आढळल्या. मालासोबतच्या पावत्या आणि मालाची पाहणी केल्यावर संपूर्ण मालसाठ्याची किंमत ४४ लाख २१ हजार ४१६ इतकी असल्याचे स्पष्ट झाले. तर पाचही वाहनांची एकत्रित किंमत ७० लाख एवढी होती.

हा तांदूळ कोल्हापूर येथील वेस्टर्न राईस मील, कर्नाटक येथील पी.के. मलगी अॅग्रोटेक आणि श्री बनशंकरी अॅग्रो प्रोसेसींग लीमीटेड या कंपन्यांकडून विनापरवानगी खुल्या बाजारात विकला जात असल्याचे पुरवठा विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले.सदर प्रकरणात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ आणि ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक अजित काकडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. यापूर्वीही पनवेलमध्ये तालुका पुरवठा अधिका-यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळ खुलेपणे विक्रीस काढण्याच्या मोठा प्रकार उजेडात आणला होता.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!