जावळीत कोट्यवधींच्या अंमली पदार्थाच्या कच्च्या मालाचा साठा जप्त; मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई
सुनील पाटील :
मेढा, जावळी: जावळी तालुक्यातील सावरी येथे मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने (युनिट 7) मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थाच्या (एमडी) कच्च्या मालाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून ४३ किलोचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रमुख मुद्दे:
स्थळ: सावरी, ता. जावळी.
जप्त मुद्देमाल: एमडीचे (MD) ३६ लीटर कच्चे द्रावण आणि ७ किलोचे इतर साहित्य, असा एकूण ४३ किलोचा मुद्देमाल.
ताब्यात घेतलेले आरोपी: ओंकार दिघे (मुख्य आरोपी) आणि पश्चिम बंगालमधील अन्य तीन कामगार.
कारवाई करणारे पथक: मुंबई क्राईम ब्रँचचे युनिट 7 (पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली).
शेड भाड्याने घेऊन ‘सेंटेंड हुक्का’ बनवण्याची थाप
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सावरी येथील गोविंद शिंदवडेर यांच्या शेतातील एक शेड भाड्याने घेतली होती. रस्त्याच्या कामासाठी कामगारांना शेड हवी आहे, असे निमित्त सांगून त्यांनी हे शेड घेतले होते. लोकांना संशय येऊ नये म्हणून ‘सेंटेंड हुक्का’ (सुगंधी हुक्का) बनवण्याचे काम सुरू असल्याची थाप मारली जात होती.
पुणे-ठाणे कनेक्शन उघडकीस
मुंबई पोलिसांनी पुणे आणि ठाणे येथे कारवाई केल्यानंतर जावळी तालुक्यातील सावरी गावातील या कारखान्याचे कनेक्शन समोर आले. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट 7 च्या पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने ही कारवाई केली.
मुख्य आरोपी ओंकार दिघे याच्यासह पश्चिम बंगालमधील अन्य तीन कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर मेढा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील मेढा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे
या मोठ्या कारवाईमुळे जावळी तालुक्यात अंमली पदार्थांच्या निर्मितीचा मोठा साठा उघडकीस आला आहे. मुंबई क्राईम ब्रँच या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.




























