शिरढोणचा ‘मिस्टर इंडिया’ विकास; कामं हवेत आणि निधी ग्रामसेवक, सरपंचासह सदस्यांच्या खिशात
हैदर अली मुजावर :
शिरढोण गावाला तसं तर संतांची आणि कष्टकऱ्यांची मोठी परंपरा, पण हल्ली तिथल्या ग्रामपंचायतीला ‘जादू’ टोण्याचं वेड लागलं असावं असं वाटतंय! कारण, सरकारी कागदावर रस्ते चकाकतात, साहित्य वाटलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र गावात फक्त ‘हवा’ आणि संबंधितांच्या खिशात ‘मवा’ दिसतोय. शिरोळ पंचायत समितीच्या अहवालाने या ‘हातचलाखीचा’ असा काही पंचनामा केलाय की, पाहून साक्षात विधाताही कपाळाला हात लावून घेईल!
सरकारी योजना म्हणजे जणू काही ‘अक्षयपात्र’च! गावात विकासाची कामं न करताच निधी हडपण्याचे जे काही प्रयोग शिरढोणमध्ये झाले आहेत, ते पाहून एखादा मोठा जादूगारही फिका पडेल. साहित्याचे वाटप न करताच, त्या साहित्याच्या नावावर आलेल्या लक्ष्मीची ‘घरवापसी’ थेट संबंधितांच्या तिजोरीत झाली आहे. यात ग्रामसेवक, सरपंच आणि काही सदस्यांनी मिळून जो काही ‘जुगलबंदी’चा कार्यक्रम सादर केला, तो आता चव्हाट्यावर आला आहे. शिरढोणमध्ये विकास झाला का? असं विचारलं तर उत्तर मिळतं- ‘झाला ना, पण तो फक्त या मंडळींच्या बँक खात्यात!’ सरकारी साहित्य म्हणजे जणू काही ‘मिस्टर इंडिया’चं घड्याळ घालून आलं होतं, जे कोणालाच दिसलं नाही, पण त्याचं बिल मात्र या त्रिकुटाला व्यवस्थित दिसलं!
या भ्रष्टाचाराच्या चिखलात दोषींना तुरुंगात धाडण्यासाठी आता मंडळी सरसावली आहेत. कष्टकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासणे, आंदोलनांचे ‘सम्राट’ विश्वास बालिघाटे, भाजपचे पोपट ऊर्फ सातगोंडा पुजारी, आणि माजी उपसरपंच अविनाश पाटील, विजय सुर्यवंशी यांसारख्या दिग्गज मंडळींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जसमीन मॅडम यांना निवेदनाचं ‘डोस’ पाजलं आहे. या मंडळींचा इशारा साधा-सुधा नाही; सात दिवसांत गुन्हे दाखल करा, नाहीतर ‘कलेक्टर’ कचेरीसमोर गाडं आडवं लावणार!
सध्या शिरढोण गावात नागरिकांमध्ये जो संताप आहे, तो पाहून असं वाटतंय की आता ‘साहेबांच्या’ खुर्च्यांना नक्कीच हादरे बसणार. ज्यांनी जनतेचा पैसा ‘पचवला’ आहे, त्यांना आता तो ‘ओकायला’ लावण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. सरकारी कामात ‘खादाडी’ करणाऱ्या या महाभागांना आता ‘तुरुंगाची हवा’ आणि ‘कायद्याचा बडगा’ अनुभवायला मिळणार असं दिसतंय. बघूया, सात दिवसांत या प्रकरणाचा ‘निकाल’ लागतो की पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’चा खेळ रंगतो!


























