नेत्यांच्या आश्वासनांचा फुगा फुटला; ‘स्वीकृत’च्या कोट्यात कार्यकर्त्यांचा जीव गुदमरला


नेत्यांच्या आश्वासनांचा फुगा फुटला; ‘स्वीकृत’च्या कोट्यात कार्यकर्त्यांचा जीव गुदमरला

पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘आश्वासनांच्या पावसाने’ दाणादाण उडवून दिली आहे! निवडणुकीच्या वेळी ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाच्या उंबरठ्या झिजवल्या, त्यांना तेव्हा नेत्यांनी ‘स्वीकृत नगरसेवक’ पदाचे जे लोणचे चाटवले होते, ते आता त्यांच्याच घशात अडकण्याची चिन्हे आहेत. शासनाने घालून दिलेल्या कोट्याच्या कात्रीत नेत्यांची ही ‘उधार आश्वासने’ पार कापली गेली असून, कार्यकर्त्यांची अवस्था आता ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे!

जागांचा दुष्काळ आणि इच्छुकांचा महापूर..!

शासनाच्या नव्या नियमानुसार या ‘स्वीकृत’ पदांच्या वाटणीचा आकडा समोर आला आणि कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

भारतीय जनता पक्ष: शंभरी ओलांडलेल्या या अवाढव्य पक्षात केवळ सात जागा! आता या सात जागांवर कोणाचे लाड पुरवायचे? ज्यांनी निष्ठेने सतरंज्या उचलल्या त्यांना की ज्यांनी बंडखोरीची तलवार म्यान केली त्यांना?

राष्ट्रवादी काँग्रेस: केवळ दोन जागांच्या तुकड्यावर कार्यकर्त्यांची भूक शमवण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.

काँग्रेस: येथे तर ‘एकच प्याला’ अशी अवस्था झाली आहे. एका जागेसाठी दहाजणांनी कोटा शिवून ठेवला आहे, आता हा कोटा कोणाच्या नशिबात आणि कोणाच्या नशिबी फक्त ‘फोटा’ (फोटो), हे लवकरच कळेल.

गाजराची पुंगी की नेत्यांची हुलकावणी..?

निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ज्या वीरांनी बंडखोरीचे झेंडे फडकवले होते, त्यांना गप्प करण्यासाठी नेत्यांनी “तुम्हाला सन्मानाने महापालिकेत नेऊ” अशा आणाभाका घेतल्या होत्या. तेव्हा हे नेते जणू कुबेराचे खजिने वाटत सुटले होते. पण आता कोट्याची मर्यादा समोर आल्यावर या नेत्यांची वाचाच बसली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी घाम गाळला, घसा फोडला, त्यांना आता ‘अतित्थी देवो भव’ म्हणण्याऐवजी ‘अति तिथे माती’ असा अनुभव येत आहे.

अंतर्गत यादवीचा ज्वालामुखी..!

या ‘स्वीकृत’ पदांच्या खेळामुळे पुण्याच्या राजकीय आखाड्यात आता पुन्हा एकदा अंतर्गत असंतोषाचा ज्वालामुखी पेटण्याची शक्यता आहे. ज्यांचा जीव या पदाच्या आशेवर टांगणीला लागला होता, त्यांचा आता पुरता ‘दमकोंडा’ झाला आहे. नेत्यांनी दिलेला आश्वासनांचा फुगा अखेर फुटला असून, आता उरला आहे तो फक्त कार्यकर्त्यांचा संताप!

थोडक्यात काय, तर… पुण्यात आता ‘स्वीकृत’चा हा पेच म्हणजे ‘मळ्यात नाही पाणी आणि पोराला हवी गाणी’ असा झाला आहे. एका जागेसाठी सतरा सव्वाशे जण रांगेत असताना, नेते आता कोणला ” प्रसन्न करतात आणि कोणत्या भक्ताला नारळ देतात, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे!

 

 


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!