राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी!


राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी!

मुंबई, पुणेसह २९ महापालिकांसाठी आचारसंहिता लागू

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज, सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील बहुप्रतिक्षित २९ महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आजपासूनच (१५ डिसेंबर २०२५) संबंधित २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे

कार्यक्रम तारीख (२०२५-२०२६)

नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे २३ ते ३० डिसेंबर २०२५

अर्जांची छाननी ३१ डिसेंबर २०२५

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २ जानेवारी २०२६

अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप ३ जानेवारी २०२६

मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६

मतमोजणी व निकाल १६ जानेवारी २०२६

महत्त्वाची नोंद:

नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारली जातील.

एकूण २,८५९ जागांसाठी निवडणूक होणार आहे, ज्यात महिलांसाठी १,४४२ जागा आरक्षित आहेत.

कोणत्या महापालिकांमध्ये होणार निवडणूक?

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, कोल्हापूर, मीरा-भाईंदर, जळगाव, नांदेड-वाघाळा, पनवेल, उल्हासनगर, मालेगाव, अकोला, लातूर, परभणी, चंद्रपूर, धुळे, सांगली-मिरज-कुपवाड, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, अहिल्यानगर (अहमदनगर).यामध्ये जालना आणि इचलकरंजी या नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिकांचा देखील समावेश आहे. बृहन्मुंबई वगळता इतर २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होईल.

राज्यातील सुमारे ३ कोटी ७८ लाख मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे आवश्यक होते, त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!