शिक्षणाची मशाल आणि समतेचा हुंकार ; इचलकरंजीत घुमला फुले-आंबेडकरांच्या क्रांतीचा विचार!

प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : “आज धर्माच्या नावाखाली शोषणाचे जे काळेबाजार मांडले जात आहेत, त्या भोंदूशाहीच्या छाताडावर पाय देऊन उभे राहण्याचे सामर्थ्य केवळ फुले-आंबेडकरी विचारातच आहे! ज्यांनी नीती आणि सदाचाराला धर्माचे सार मानले, त्यांच्या विचारांचा विसर पडणे ही आजच्या समाजाची सर्वात मोठी शोकांतिका आहे,” अशा तडाखेबंद आणि जहाल शब्दांत तरुण अभ्यासक देवदत्त कुंभार यांनी प्रतिगामी विचारांचा समाचार घेतला.
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने महात्मा फुले यांचे २०० वे जन्मवर्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून आयोजित ‘फुले-आंबेडकरांची विचारधारा’ या चर्चासत्रात कुंभार यांचे ‘अत्रे शैली’तील भाषण चांगलेच गाजले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नौशाद शेडबाळे होते.
देवदत्त कुंभार यांनी आपल्या भाषणात व्यवस्थेवर प्रहार करताना स्पष्ट केले की, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांनी समतेचा जो विचार मांडला, तो केवळ भाषणापुरता नव्हता. स्त्रिया आणि बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना गुलामगिरीतून मुक्त करणे, हाच या दोन्ही महापुरुषांचा मुख्य अजेंडा होता. आजच्या काळात व्यक्तीने आपले स्वातंत्र्य गमावणे ही चिंतेची बाब असून, याविरोधात लढणे हीच या महापुरुषांना खरी श्रद्धांजली ठरेल.
“शेतकऱ्यांच्या आसूडाचे फटके आजही दिल्ली-मुंबईच्या दरबारी बसणे गरजेचे आहे,” असे सांगून कुंभार पुढे म्हणाले की, महात्मा फुलेंनी मांडलेली शेतमालाच्या हमीभावाची मागणी आजही तितकीच ज्वलंत आहे. फुलेंच्या या संघर्षातूनच बाबासाहेबांना संविधान निर्मितीसाठी बळ मिळाले.
अध्यक्षीय भाषणात नौशाद शेडबाळे यांनी शेती, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांतील फुले-आंबेडकर विचारांची गरज अधोरेखित केली. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून या चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला.
या ऐतिहासिक विचारांच्या जागर प्रसंगी शशांक बावचकर, अशोक केसरकर, पांडुरंग पिसे, सचिन पाटोळे, रणजीत यादव, शकील मुल्ला, शहाजी धस्ते, रामभाऊ ठिकणे, मनोहर जोशी, अशोक माने यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अन्वर पटेल यांनी मानले.































