सत्तेच्या ‘चाकण’खिंडीत महिलांचे चारित्र्य पणाला !


पुण्यात महिला काँग्रेसचा रणतडाखा ; ‘भोंदू’ खरातचे पाठीराखे कोण?

पुणे |  विद्येच्या माहेरघरात आज संस्कारांचे धिंडवडे निघाले आणि त्या धिंडवड्याला वाचा फोडली ती शहर महिला काँग्रेसच्या रणरागिणींनी! ज्यांच्याकडे राज्यातील अबलांना न्याय देण्याची धुरा होती, त्या रुपाली चाकणकर याच जर भोंदूबाबा खरातसारख्या नराधमाच्या पाठीशी उभ्या राहत असतील, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेली ही कसली कीड समजायची? “रुपाली चाकणकरांना अटक करा” आणि “मंत्र्यांची चौकशी करा” अशा गगनभेदी गर्जनांनी आज फर्ग्युसन कॉलेज रोडचा परिसर अक्षरशः हादरून गेला.

 

जोड्यांच्या प्रहारांनी पुणे थरारले!

आज शनिवारी सकाळी, पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन पार पडले. हे आंदोलन केवळ राजकीय नव्हते, तर ते अस्मितेचे होते. खरात नावाच्या ज्या ‘भोंदू’ बाबाने महिलांच्या शोषणाचे उकिरडे फुंकले, त्याला अभय देणाऱ्या सत्तेतल्या मंत्र्यांचा बुरखा फाडण्यासाठी या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. चाकणकर आणि खरात यांच्या प्रतिमांना जोड्यांनी झोडपून काढत, पुण्याच्या महिलांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

स्वाती शिंदेंचा सडेतोड सवाल!

आंदोलनाचे नेतृत्व करताना स्वाती शिंदे यांची तोफ धडाडली. त्या म्हणाल्या,

“ज्या रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या खुर्चीवर बसून न्यायाच्या गप्पा मारत होत्या, त्यांनीच महिलांच्या चारित्र्याशी खेळ मांडला आहे. हा गुन्हा अक्षम्य आहे! खरात हा महाराष्ट्राचा ‘एपस्टीन’ आहे आणि त्याला राजाश्रय देणाऱ्या मंत्र्यांची खुर्ची आता हललीच पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग करणाऱ्या आणि शोषणाला साथ देणाऱ्या या चाकणकरांना अटक झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही!”

‘राष्ट्रवादी’ला घरचा अहेर!

फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अशा ‘कलंकित’ नेतृत्वाला तात्काळ पक्षातून डच्चू द्यावा, अशी मागणीही यावेळी जोरकसपणे करण्यात आली. हातामध्ये फलक घेऊन, “मंत्र्यांनो खुर्च्या खाली करा” अशा घोषणा देत महिलांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापूरे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले. आजच्या या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांच्या झोपा उडवल्या असतील यात शंका नाही, पण ‘भोंदू’ आणि त्यांचे ‘रक्षक’ गजाआड जाणार का? हाच खरा प्रश्न आहे.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!