महापालिका आयुक्त झोपलेत की विकले गेलेत?
पुणे महानगरपालिकेचे कुंभकर्णी प्रशासन आणि मुळा नदीचे पात्र गिळंकृत करू पाहणारे भ्रष्ट कंत्राटदार यांच्या अभद्र युतीचा पर्दाफाश करण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (सचिन खरात गट) वतीने एक जळजळीत पत्रकार परिषद पार पडली. “नदी वाचवा, नाहीतर याद राखा!” असा थेट इशाराच मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर) यांनी यावेळी दिला.
पाणी नव्हे, बोपोडीत मृत्यूचा सापळा!
प्रभाग क्रमांक ८ मधील बोपोडी परिसरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पात्रात आज विलोभनीय दृश्य नसून, प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा ‘राडा-रोडा’ साचला आहे. पावसाळा तोंडावर आहे, पण महापालिकेला याचे सोयरसुतक नाही. नव्या पुलाच्या कामाचा ढिगारा तिथेच सडतोय, तर रेल्वे पुलाच्या कंत्राटदाराने तर मुजोरीचा कळस गाठला आहे! कुठलीही परवानगी न घेता नदीपात्रात बाहेरून राडारोडा आणून चक्क रस्ताच तयार केला आहे. ही विकासकामे आहेत की नदीची हत्या करण्याचा कट? असा तिखट सवाल फिरोज मुल्ला यांनी विचारला.
२५-३० सोसायट्यांवर पुराची टांगती तलवार!
नदीचा प्रवाह रोखला गेल्यामुळे उद्या जर मुसळधार पाऊस झाला, तर बोपोडी गावठाणासह परिसरातील ३० सोसायट्यांमध्ये पाणी घुसणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. मग होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीला जबाबदार कोण? आयुक्त की ते निगरगट्ट इंजिनिअर? रिव्हर फ्रंटच्या नावाखाली ‘ग्रीन बेल्ट’ आणि ‘ब्ल्यू लाईन’ची ऐशीतैशी करून जमिनी हडपण्याचे हे कारस्थान असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.
“प्रशासनाचा मुख्य हेतू नागरिकांची सोय नसून, सिमेंटचे ब्लॉक टाकून निसर्गाचा गळा घोटणे हाच आहे. कोट्यवधींचा निधी असूनही संरक्षक भिंत का बांधली जात नाही? की कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठीच हा सर्व खेळ सुरू आहे?”— फिरोज मुल्ला (सर), मुख्य संघटक, महाराष्ट्र राज्य.
आता न्यायालय आणि जनआंदोलनच तारणार !
‘रिपाई’ने स्पष्ट केले आहे की, प्रशासनाला दिलेल्या निवेदनांची कचराकुंडी झाली आहे. आता गप्प बसणार नाही ! तातडीने राडारोडा उपसा करून नदीपात्र मोकळे करा !
चंद्रमणी संघ वस्ती ते बोपोडी ब्रिजपर्यंत संरक्षक भिंत तातडीने बांधा ! चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या इंजिनिअर आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा !
या मागण्या मान्य न झाल्यास केवळ लोकशाही मार्गाने जनआंदोलनच होणार नाही, तर या भ्रष्ट कारभाराविरोधात ‘हरित लवादा’त (NGT) याचिका दाखल केली जाईल. स्वाक्षरी मोहीम राबवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे कान टोचले जातील, असे यावेळी ठणकावून सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, ज्येष्ठ नागरिक शामकांत पाटील, राहुल घोडके, संदीपभाऊ शेंडगे, प्रवीण चव्हाण आदी कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला होता. आता बघायचे हे की, पुणे मनपाचे ‘पाषाणहृदयी’ अधिकारी जागे होतात की बोपोडीला जलसमाधी मिळण्याची वाट पाहतात!




























